महापुराची झळ बसलेल्या भागातील लोकांचे आणि शालेय मुलांचे मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत समुपदेशनाचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. पूरग्रस्त १०३ गावांमध्ये हा उपक्रम ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, प्रथम ज्योत फाउंडेशन, आयएमए यांच्या सहकार्याने हाती घेण्यात आला आहे.

जिल्ह्य़ातील आलेल्या महापुराची झळ कृष्णा, वारणा आणि येरळा नदीकाठच्या गावांना बसली. मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील १०३ गावांना याचा फटका मोठय़ा प्रमाणात बसला. पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील जनतेला व मुलांना मानसिक आधार देण्यासाठी समूपदेशन करणे गरजेचे आहे, असे अभिप्राय लोकप्रतिनिधी व समाजसेवी संस्थांकडून प्राप्त झाले आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

जिल्हा परिषदेने सर्व १०३ गावांमध्ये समूपदेशन सत्राचे नियोजन केले आहे. यामध्ये ग्रामस्थ व विशेषत शालेय विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावर भर दिला जाणार आहे. समुपदेशन सत्रासाठी आर्ट ऑफ लिव्हींग, प्रथम ज्योत फाऊंडेशन व मेडीकल असोसिएशन (आयएमए) यांचे सहकार्य लाभणार आहे. समुपदेशन सत्रांसाठी महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष देशमुख यांनी दिली.

या समुपदेशन सत्रामध्ये सर्वप्रथम ध्वनिचित्रफीत प्रदíशत करण्यात येत असून त्यानंतर उपस्थित पूरग्रस्तांचे अनुभव कथन,  समुपदेशनपर व्याख्यान आणि पथनाटय़ असा कार्यक्रम सादर केला जात असल्याची माहिती राऊत यांनी दिली.