News Flash

सांगली जिल्हा बँक संचालकांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

जिल्हय़ातील वसंतदादा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असतानाच आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटींच्या गरव्यवहारप्रकरणी संचालकांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश निघाले असल्याचे समजते. या आदेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याची शक्यता आहे.

जिल्हय़ातील वसंतदादा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. याच बँकेत महापालिकेच्या ५३ कोटींच्या ठेवी अडकल्या असून, महापालिकेचा आíथक डोलारा शासनाच्या एलबीटीपोटी मिळणाऱ्या अनुदानावर तरला असतानाही ठेवी मिळण्याबाबत कोणतीच चिन्हे सध्या दिसत नाहीत.

वसंतदादा बँकेतील अनियमित कर्जपुरवठा, नियमबाह्य सवलती यामुळे सहकार कायदा कलम ८८ नुसार चौकशी सुरू आहे. यामध्ये कलम ७३ (३) अन्वये माजी संचालक व अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. चौकशी सुरू असलेल्या एका संचालकाने २८ डिसेंबर २०१६ रोजी त्यांच्या मालमत्ता विक्रीची एक जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली. या बाबतची माहिती एका ठेवीदाराने चौकशी अधिकाऱ्याच्या नजरेस आणून दिली. जे जबाबदार आहेत, त्यांच्याकडून वसुलीसाठी मालमत्ता ताब्यात घेण्याची तरतूद असली तरी तत्पूर्वी मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतरण झाले तर वसुली अशक्य होते.

यामुळे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी वसंतदादा बँकेतील गरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल असलेल्या २६ माजी संचालकांच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिले आहेत. यामुळे मालमत्तेची विक्री, हस्तांतरण, तारण गहाण किंवा भाडय़ाने देणे, इतरांना हक्क व अधिकार बहाल करणे याला प्रतिबंध बसला आहे. या मालमत्तावर तत्काळ बोजा अथवा नाव चढवले जाणार नसले तरी वसुलीबाबतची चौकशी पूर्ण होऊन अंतिम निर्णय लागेपर्यंत कोणताच बदल करता येणार नाही.

यामध्ये स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी उपमहापौर किरण जगदाळे, नगरसेवक सुरेश आवटी, नरसगोंडा पाटील, अमरनाथ पाटील, शशिकांत पाटील, माधवराव पाटील, तुकाराम पाटील, प्रमिलादेवी माने, सुभाष कांबळे, दादासाहेब कांबळे, निवृत्ती पाटील, प्रेमा बिरनाळे, नीता भगाटे, गीता पाटील, जंबू थोटे, भरत पाटील, बेबीताई पाटील, निवास देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, सुधाकर आरते, गजानन गवळी, सर्जेराव पाटील, सुरेश जिनगोंडा पाटील, अरिवद पाटील, श्रीमपाल बिरनाळे, आनंदराव पाटील आदी माजी संचालक आणि भूपाल चव्हाण व प्रकाश साठे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वसंतदादा सहकारी बँकेतील ३५० कोटींच्या गरव्यवहारानंतर जिल्हा बँकेतील १५७ कोटींच्या गरव्यवहारप्रकरणी मालमत्ता जप्तीच्या कारवाईचे संकेतही आज मिळाले. यामध्ये राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून, यामध्ये ५ विद्यमान संचालकही आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आदींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:13 am

Web Title: sangli district bank scam
Next Stories
1 सिद्धेश्वर यात्रेत नयनरम्य अक्षता सोहळा संपन्न
2 थंडीने पिकांना उभारी
3 स्टेट बँक स्टाफ युनियनच्या मुंबईतील विश्रामगृह खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप
Just Now!
X