पतंगराव कदम यांच्या निधनाने काँग्रेसचा आधार गेला

जिल्ह्य़ाच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात महत्त्व असलेले भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने केवळ काँग्रेसचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्य़ाचे राजकीय भवितव्य अंधारात सापडले आहे. जिल्ह्य़ाचे नेतृत्व आता कुणाकडे असा प्रश्न काँग्रेसच्या समोर आहे. तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला आधार कोणाचा हा प्रश्न असून आता दुसऱ्या फळीतही राज्यावर प्रभाव पाडू शकणारे नेतृत्व काँग्रेसकडे उरलेले नाही. यामुळे नजीकच्या काळात सरभर झालेल्या काँग्रेसची स्थिती कप्तान गमावलेल्या नौकेसारखी होण्याचीच चिन्हे आहेत.

एकेकाळी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी करून वांगी भिलवडी मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व मिळविलेल्या पतंगरावांनी मोठय़ा हिकमतीने आपली जागा पक्षात आणि पक्षाबाहेर निर्माण करण्यात यश मिळविले होते. अगदी मिसरूडं फुटण्याच्या वयात विद्यापीठ स्थापनेचे स्वप्न आणि तेही खिशात अवघे ३८ रुपये असताना एवढे मोठे साम्राज्य उभे करणे आणि या साम्राज्याच्या जोरावर राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. यासाठी जी जिद्द हवी ती सध्या कोणा नेत्याकडे अभावानेच आढळेल.

सांगली म्हटले की, आजही क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांची नावे घेतली जातात. याचबरोबर सांगलीला विकासाच्या वाटेवर नेणारे वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्यासारखे राज्य स्तरावरील नेतृत्व लाभले. या नावामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये सांगलीचा वेगळा दबदबा आहे. या नेतृत्वाच्या फळीतील पतंगराव कदम होते. अगदी वसंतदादा पाटील यांच्या विरोधात उभे ठाकून राजकारणात येणाऱ्या पतंगरावांनीही दादांचा शब्द प्रमाण मानत सामान्य माणूस नजरेसमोर ठेवत अगोदर समाजकारण करण्याला महत्त्व दिले.

राजकीय क्षेत्रात मिळालेल्या संधीचा वापर कार्यकत्रे आणि माणसं जोडण्यासाठी करायचा याची शिकवण त्यांना बसलेल्या गरिबीच्या चटक्याने दिली होती. यामुळेच जिल्ह्य़ात जे काही नेतृत्व उदयाला आले त्यामध्ये दादापाठोपाठ आर. आर. आबा आणि पतंगराव यांचे नाव घेतले जाते.

जिल्ह्य़ात दादांच्या हयातीमध्ये पतंगराव कदम, आर. आर. आबा, जयंत पाटील यांचे नेतृत्व उभे राहिले. यामुळेच दादांच्या पश्चात राजकीय क्षेत्रात सांगलीचे महत्त्व कमी झाले नाही उलट सत्तेच्या राजकारणात सांगलीचे वर्चस्व कायम राखण्यात हे दादांच्या कालखंडात दुसऱ्या फळीत असलेल्या नेत्यांनी यशस्वी ठरले. गेल्या आठ-दहा वर्षांत मात्र नवे नेतृत्व उभे राहू शकले नाही. हीच मोठी राजकीय शोकांतिका म्हणावी लागेल. गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीप्रणीत विकास महाआघाडीकडून सत्ता हस्तगत करण्यात मदन पाटील आणि पतंगराव कदम यांचे संयुक्त प्रयत्न होते. वसंतदादांचे नातू प्रतीक आणि विशाल पाटील यांची मानसिकता असली तरी कृष्णेच्या पाण्यात बऱ्याच गोष्टी आता वाहून गेल्या आहेत. केवळ वारसा सांगून लोकांच्यात विश्वास निर्माण करण्यात ही वारसदार मंडळी फारशी यशस्वी झाल्याचे दिसत नाही. कधीकाळी मार्केट यार्डातील विजय बंगल्यातून जिल्ह्य़ाच्या राजकारणाची सूत्रे हलत होती. यातूनच सेना-भाजपच्या युती शासनाला बळकटी मिळाली होती. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, शिराळा आणि वांगी भिलवडी या पाच मतदारसंघात पाच अपक्ष निवडून देण्याची किमया या राजकीय डावपेचातून साकारली. मात्र, त्या वेळी करायला गेलो एक आणि झाले तिसरेच अशी अवस्था तत्कालीन नेतृत्वाची झाली असली तरी जिल्ह्य़ाचा राजकीय दबदबा कायम ठेवण्यात सर्वच नेते यशस्वी ठरले होते.

पतंगरावांच्या पश्चात काँग्रेसला ऊर्जा देणारा घटक कोण हा खरा प्रश्न आहे. कारण आज महापालिकेत आणि जिल्ह्य़ात मदन पाटील यांचा कार्यरत असलेला गटही नेतृत्वहीन झाला आहे. सध्या या गटाचे नेतृत्व जयश्रीताईकडे असले तरी ते एवढे सक्षम नाही. याचा लाभ भाजपने घेतला नाही तर नवलच. गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसला अंतिम प्रहार करण्याची नामी संधी महापालिकेच्या निमित्ताने लाभली आहे. अधिकारवाणीने सांगणारे नेतृत्व नसल्याने जो तो मनाचा नेता बनणार आहे. विशाल पाटील ही जागा घेण्याचा प्रयत्न करणार असे दिसते. मात्र, त्यांनाही मर्यादा आहेत. या मर्यादाच काँग्रेसला मारक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे दादांचा वारश्याचे भांडवल हाती असल्याने ते किती दिवस पुरवून वापरायचे हा प्रश्नच आहे. राजकारणात जी विश्वासार्हता लागते ती कितपत मिळणार यावरच जिल्हा नेतृत्वाचे भवितव्य अवलंबून आहे.

दुष्काळ कायम..

जिल्ह्य़ाचे नेतृत्व आता कोणाकडे हा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे कसब असले तरी पडद्याआडच्या राजकारणामुळे विश्वासाहर्ता कमी आहे. त्यांचे स्वतचे असे स्थान पक्षात आणि मतदारसंघात असल्याने त्यांना जिल्ह्य़ातील अन्य घडामोडींची फिकीर करावी लागत नाही. त्यांनीही जिल्ह्य़ात दुसऱ्या फळीतील नेतृत्व उभे राहणार नाही याची दक्षता घेतल्याने जशी अवस्था काँग्रेसची तीच अवस्था आज राष्ट्रवादीची आहे. भाजपला जिल्ह्य़ाने भरभरून दिले. एक खासदार, तीन आमदार दिले. या तुलनेत सत्तेतील वाटय़ाचा विचार केला तर चित्र आशादायक नाही. केवळ अर्धा मंत्री एवढीच राजकीय ताकद आणि तीही स्वाभिमानीत फूट पाडण्यासाठी केलेली खेळी. यामुळे जिल्ह्य़ात भाजपला यश मिळूनही नेतृत्वाचा दुष्काळ कायम राहण्याचीच चिन्हे आहेत.