दिगंबर शिंदे

एकीकडे करोनाचे संकट घोंघावत असताना राजकीय रंगमंचावर मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू आहेच, पण यंदा पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे केंद्रही सांगलीच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणामध्ये राष्ट्रवादीही सरस उमेदवार देण्याच्या तयारीत आतापासूनच आहे. उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी कृष्णाकाठचे कुंडल आता नव्या उमेदीने तयारी करीत आहे.

पुणे पदवीधर मतदार संघामध्ये पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्य़ांचा समावेश आहे. पदवीधर मतदार संघाचे  प्रतिनिधित्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे करीत होते. मात्र कोथरूडमधून त्यांनी विधानसभेचा रस्ता धरल्याने हा मतदार  उमेदवारी आता मिळविण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मकरंद देशपांडे, शेखर चरेगावकर, राजेश पांडे, अंकिता पाटील, सचिन पटवर्धन, संग्राम देशमुख, शौमिका महाडिक आदी नावे सध्या तरी भाजपच्या तंबूत चर्चेत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली असल्याने आघाडीचा एकच उमेदवार असेल असे राजकीय समीकरण दिसत आहे. सध्यातरी राष्ट्रवादीकडून लाड आणि सोलापूर जिल्हा परिषदेतील गटनेते उमेश पाटील यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. या मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकद  पाहता आणि मागील निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीचा आघाडीच्या उमेदवारीवर पहिला हक्क दिसत आहे. हे ओळखूनच राष्ट्रवादीची पेरणी सुरू आहे. मागील निवडणुकीमध्ये अखेरच्या क्षणी सारंग पाटील यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली. मात्र कुंडलच्या क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अरुण लाड यांची उमेदवारी भाजपच्या चंद्रकांतदादांच्या उमेदवारीला पोषक ठरली. गतवेळी झालेली चूक सुधारण्याचे प्रयत्न यावेळी वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून सारंग पाटील यांनी आपण या निवडणुकीत उतरणार नसल्याचे सांगत प्रचाराची केवळ धुरा सांभाळणार असल्याचे जाहीर केल्याने सांगलीचे महत्त्व वाढले आहे.

मतदार संघ आणि मतदार विस्तृत असल्याने आतापासूनच तयारी करणे हे महत्त्वाचे असल्याने जो तो उमेदवारीचे नंतर  पाहू, मतदार नोंदणी आणि वैयक्तिक संपर्क साधण्याचा आतापासूनच प्रयत्न करीत आहे. पदवीधर मतदार संघाचे एकेकाळी नेतृत्व केलेले मिरजेचे प्रा. शरद पाटील हेही यावेळी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यांच्या पक्षालाही मर्यादा आहेत.

गतवेळी बंडखोरीचा भाजपला लाभ

या मतदार संघामध्ये २००२ साली भाजपाध्ये बंडखोरी होऊन प्रकाश जावडेकरांच्या विरोधात कोल्हापुरातून सुनील मोदी यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे प्रा. शरद पाटील यांचा विजय झाला होता. मागील वेळी म्हणजे २०१४ साली भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांना ६१ हजार ४५३ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना ५९ हजार ७३ मते मिळाली होती. याच वेळी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार लाड यांना ३७ हजार १८९ ते मिळाली होती. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या मत विभागणीचा फायदा चंद्रकांतदादांना झाला होता. ते केवळ २३८० मतांनी निवडून आले होते.

मोर्चेबांधणी सुरू

पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक मे महिन्यात अपेक्षित होती, पण करोना संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. तरीही दिवाळीनंतर पुन्हा एकदा मतदार नोंदणी आणि जानेवारीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. मतदार नोंदणी आणि मतदारांशी वैयक्तिक संपर्क यावरच या निवडणुकीचा कल अवलंबून राहणार असल्याचे आतापासूनच तयारी महत्त्वाची असल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.