News Flash

सांगलीच्या ऊर्वी पाटीलकडून सरपास शिखरावर तिरंगा

राज्यातील सर्वात लहान वयात सरपास शिखर सर करणारी ऊर्वी पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली.

ऊर्वी पाटील

सांगली : हिमालयातील १३ हजार ८०० फूट उंचीवर असलेले सरपास शिखर. काळाकुट्ट भोवताल. तापमान शून्याखालीही ८ सेल्सियस, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगवान वारे, अशा प्रतिकूल स्थितीत जिल्ह्यच्या पूर्वेला असलेल्या दंडोबाच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या १० वर्षांच्या ऊर्वीने सरपास शिखरावर तिरंगा रोवला. जिल्ह्यच्या इतिहासात नोंद करीत असतानाच राज्यातील सर्वात लहान वयात सरपास शिखर सर करणारी ऊर्वी पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली.

ऊर्वी अनिल पाटील हिचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील खरिशग. वडिलांच्या नोकरीनिमित्त सध्या वास्तव्य गोव्यात. शिखर सर करून परतल्यावर तिने या विक्रमाची माहिती देताना सांगितले, की सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कॅ म्प वरून ४ मे २०१८ पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे छोटे ट्रेक केले. पुढे ७ मे पासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. कसोल हे ६ हजार ५०० फुटावरचा बेस कॅम्प असून पुढे ग्राहण (७८०० फूट), पद्री (९३०० फूट) मिन्थाज (११२०० फूट), नगारू (१२५०० फूट), बिस्करी (११००० फूट) आणि बंधकथाज (८००० फूट) असे कॅम्प होते.

तिने सांगितले, की या सर्व कॅम्पमध्ये नगारू ते बिस्करी या कॅम्प दरम्यान सरपास हे १३ हजार ८०० फुटांवरील शिखर आहे आणि हे शिखर ट्रेकिंगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे १४ कि.मी. चा संपूर्ण प्रवास बर्फातला असून अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे २ वाजता होते. चहा आणि गरम पाण्याबरोबर गूळ व फुटाणे हा अल्पोपाहार करून मी ट्रेकिंगला सुरुवात केली. मात्र, याच वेळेस वातावरण अचानक बिघडले आणि बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याचे ऊर्वीने सांगितले.

अशाही परिस्थितीत ट्रेक करण्याची सूचना कॅम्प लीडर यांनी दिल्याने पुन्हा पहाटे ३.१५ वाजता ट्रेकिंगला सुरुवात झाली. २०० मीटरच्या अत्यंत अवघड चढाईनंतर सरपासच्या पठाराला सुरुवात झाली. १४ मे २००८ ला पठारावर पोहोचल्याने सरपास सर केल्याचा आनंद मोठा होता. माझ्यासारख्या लहानग्या मुलीसाठी ही खूप मोठी उपलब्धीही होती.

हिमालयातील सरपास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारीरिकरीत्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दीड तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धा तास योगा व  व्यायाम करायचे. आहारामध्ये प्रामुख्याने सीफूड व सुका मेवा घेत असे.

हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरचे कपडे, गॉगल, ट्रेकिंग बूट, स्टीकही खरेदी केल्याचा  या प्रवासात खूप फायदा झाल्याचे ऊर्वीने आत्मविश्वासाने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे गावच्या उशाला असलेल्या दंडोबाच्या डोंगरावर सातत्याने केलेला सरावही लाभदायी ठरला.

सरपास हे अत्यंत अवघड शिखर सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे आणि जगातील सर्वात अवघड एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून एवरेस्ट बेस कॅम्प करण्याचे माझे ध्येय असल्याचे ऊर्वीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:28 am

Web Title: sangli girl urvi patil set record in trekking
Next Stories
1 एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांनाही ‘आरटीई’मध्ये प्रवेश
2 अभियंत्यांपाठोपाठ शिक्षकही बेरोजगार
3 युती न झाल्यास एकटे लढून स्वबळावर सत्ता मिळवू
Just Now!
X