गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांनी आपले प्राणही गमावले आहे. या पूरस्थितीचा महाराष्ट्र परिवहन मंडळालाही मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नाशिकसह महत्वाच्या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एसटीच्या फेरीवर परिणाम झाला. एसटीचा दररोज 18 हजार बसेसच्या माध्यमातून ५५ लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. त्यातून सरासरी २२ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दहा दिवसापासून दररोज एसटीचे किमान १० लाख किमीच्या बस फेऱ्या रद्द होत आहेत. पूरग्रस्त परिस्थितीमुले एसटीला तब्बल १०० कोटींचा फटका बसला आहे.

एसटीची मराठवाडा वगळता दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. गेले दहा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे दररोज ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले असून आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तसेच अनेक आगार आणि बसस्थानकांमध्ये पाणी साचल्याने बसगाडय़ांसह आगारांमधील स्थावर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. हे एकूण नुकसान १०० कोटींच्या घरात जाते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळ मुख्यालयाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र लिहून अतिवृष्टी व प्रवासी भारमान कमी झाल्यावरही बसफेऱ्या कमी न केल्याने महामंडळाला रोज लक्षावधींचा फटका बसला आहे. यापुढे अनावश्यक फेऱ्या चालवणारे आगार व्यवस्थापक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. या भितीपोटी काही पूर नसलेल्या भागातील बसफेऱ्या बंद झाल्या काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्य़ात एसटीच्या १,६०० किलोमीटर रोजच्या प्रवासाला कात्री लावण्यात आली आहे.