दयानंद लिपारे, कोल्हापूर

पावसाने घेतलेली उसंत, पुराचे किंचित ओसरलेले पाणी यामुळे सांगली-कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर आनंदाची स्मितरेषा उमटली,पण जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे त्यांची जगण्याची धडपड वाढली. पाहावे तिकडे पाणीच पाणी पण पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा थेंब नाही. दूध मिळेना आणि पेट्रोलसाठी किलोमीटर लांब रांगा, भाजीपाला महागलेला अशा संकटाच्या मालिकेने जगण्याची लढाई बिकट होऊ  लागली आहे.

या दोन्ही शहरांतील पिण्याची पाणीपुरवठा यंत्रणा गेले पाच दिवस बंद आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक हैराण झाले आहेत. अनेक पाणी योजना पाण्याखाली गेल्या आहेत. ज्या गेल्या नाहीत त्या विद्युत पुरवठय़ाअभावी बंद आहेत. यामुळे सध्या दोन्ही शहरांत पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पेयजल मिळणाऱ्या केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेने पाणीपुरवठा खंडित होणार असल्याचे जाहीर केल्याने तोंडाचे पाणी पळाले आहे. सध्या शहरात टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करणारा टँकर आला की त्याभोवती गल्ली, अपार्टमेंटमधील लोक रांगा लावत आहेत. पूरस्थितीत अद्यापही भयंकर असल्याने अजून किती दिवस हा पाणी पुरवठा बंद राहणार याबाबत काहीही प्रशासन सांगू शकत नाही. मात्र, पाऊ स असाच राहिल्यास लोकांना अधिकच अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हीच गोष्ट दूध आणि भाजीपाल्याची आहे. या दोन्हींचा पुरवठा अद्याप सुरू झालेला नसल्याने लोक  त्रस्त आहेत. पेट्रोल-डिझेल उपलब्ध नाही. जिथे आहे, ते प्रशासनाने बचाव कार्यासाठी ताब्यात घेतलेले आहे. कोल्हापूर शहरामध्ये तिसऱ्या दिवशीही पेट्रोलची टंचाई होती. त्यामुळे अनेकांची वाहने पेट्रोल नसल्याने बंद आहेत. जिथे इंधन मिळत आहे तिथे भली मोठी रांग लागली आहे. कोल्हापुरातील बस स्थानक परिसरातील सुरू असलेल्या पंपावर ही रांग एक किलोमीटरवर गेली होती. जोपर्यंत पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग सुरू होत नाही, तोपर्यंत इंधन पुरवठा होणार नाही. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत इथल्या लोकांना अशीच टंचाई भासणार असल्याचे चित्र आहे.

या पुरानंतर या दोन्ही शहरांत आता साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत मिळण्यातही अडचण येत आहे. अनेक खासगी दवाखाने, रुग्णालये देखील पाण्यात असल्याने या मदतीलाही मर्यादा पडत आहेत. शासनाच्या वतीने तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन्ही शहरांत वैद्यकीय उपचारांची शिबिरे सुरू करण्यात आलेली आहेत. मात्र एकूण संख्येच्या तुलनेत ही मदत तोकडी आहे.