सांगली : लोकसभेच्या सांगलीच्या जागेबाबत येत्या दोन दिवसात निर्णय अपेक्षित असून काँग्रेसच्याच वाटय़ाला ही जागा राहील, असा विश्वास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार बठकीत सांगितले.

आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असली तरी या बाबीची कुणकुण लागताच जिल्हयातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पत्र पाठवून सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यास विरोध केला आहे. स्वाभिमानीला आता वर्धा येथील जागा देण्याबाबत विचार सुरू असून येत्या दोन दिवसात याबाबतचा निर्णय होईल. मात्र सांगलीची जागा पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, उमेदवारीसाठी माझ्यासह विशाल पाटील यांचेही नाव केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तर सर्वजण एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचेही ते म्हणाले.

निवडणूक लढविण्यासाठी आपणही तयारी केली असून लोकसभा मतदार संघात असलेल्या सहाही मतदार संघांचा दौरा आपण पूर्ण केला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण उमेदवारीची मागणी केली असून पक्ष निश्चितपणे सकारात्मक विचार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.