गीता सुतार, सवित मदने यांच्यात चुरस

सांगली : आठ दिवसांची मागितलेली मुदत पक्षाने नाकारल्याने अखेर महापौर संगीता खोत यांनी आपल्या पदाचा सोमवारी महासभेत राजीनामा दिला. तर, उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षादेश मान्य असल्याचे सांगितले. आता नवीन महापौरपदासाठी भाजपमधून गीता सुतार आणि सवित मदने यांच्यात कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

महापौर आणि उपमहापौर यांना आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत असा आदेश आ. सुधीर गाडगीळ यांच्यामार्फत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला होता. या आदेशानुसार सूर्यवंशी यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा देण्याची तयारी लगेचच दर्शवली. मात्र श्रीमती खोत यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता आणि महापूर यामुळे पाच महिने कामच करता आले नसल्याचे सांगत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तरीही पक्षाने हा आग्रह अमान्य करीत अन्य कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, तुम्हाला दिलेली सव्वा वर्षांची मुदत संपली असल्याने राजीनामा द्यावा असे सांगितले.

तरीही प्रजासत्ताक दिनाच्यावेळी ध्वजवंदन महापौरांच्या हस्ते करण्याची परंपरा असल्याने तोपर्यंत तरी संधी मिळावी, अशी मागणी श्रीमती खोत यांनी पक्षाच्या नेत्यांकडे लावून धरली होती. सोमवारी सकाळी आ. सुधीर गाडगीळ, नगरसेवक व प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बठकीमध्ये महापौरांना राजीनामा आजच्या महासभेतच सादर करण्याचे निर्देश दिले गेले.

यानुसार आज श्रीमती खोत यांनी महापौर पदाचा राजीनामा आयुक्तांना सादर केला, तर उपमहापौर सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला. यामुळे नवीन महापौर निवडीच्या हालचाली आता गतिमान होणार असून अजून एक वर्षांसाठी महापौर पद ओबीसी महिलांसाठीही राखीव आहे. या आरक्षित गटामधून गीता सुतार आणि सविता मदने या दोन महिला सदस्या इच्छुक असून यापैकी कोणाला संधी दिली जाते याकडे लक्ष  लागून राहिले आहे.

दरम्यान, शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कंदील घेऊन सभागृहात प्रवेश केला. शहरातील पथदिव्यांची दुरूस्ती करण्यासाठी खाजगी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून तक्रारी करूनही पथदिवे बसविले जात नसल्याकडे या सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे अभिजित भोसले, राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांच्यासह आघाडीचे सर्व सदस्य कंदील घेउन सभागृहामध्ये आले होते.