महापौरपदासाठी देण्यात आलेली मुदत संपली असल्याने महापौरपदाचा राजीनामा द्यावा, असा गटनेते किशोर जामदार यांनी दिलेला सल्ला आपण मानत नसून राजीनामा देण्यास ठाम नकार महापौर विवेक कांबळे यांनी दिला आहे. मदन पाटील यांच्या पश्चात अवघ्या महिन्यात महापालिकेत संगीत खुर्चीचा खेळ रंगात आला असून खुल्या गटातील महापौर निवडीवेळी होत असलेल्या राजकीय नाटय़ाची ही रंगीत तालीम मानली जात आहे.
कांबळे यांना महापौरपदाची संधी देत असतानाच ऑगस्ट २०१५५ पर्यंत संधी देण्यात आली होती. असा दावा एका गटाने केला आहे. यानुसार मदन पाटील यांनी दिलेला आदेश पाळण्याचा सल्ला देत गटनेते किशोर जामदार यांनीही सत्ताबदलाला अनुकूलता दर्शवली असल्याने येत्या काही दिवसात महापालिकेचे राजकारण धुमसत राहणार आहे.
मदन पाटील यांनी ज्येष्ठत्वाच्या कसोटीवर विवेक कांबळे यांना महापौरपदाची संधी देत असताना उर्वरित ६ महिन्यांसाठी अन्य दोघांना संधी देण्याची मागणी एक गट करीत आहे. महापौर निवडीवेळी बसवेश्वर सातपुते आणि शेवंता वाघमारे यांनी जोरदार दावा केला होता. त्यावेळी अंतिम काही कालावधीसाठी संधी देण्याचा शब्द मदन पाटील यांनी दिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातूनच महापौरबदलाच्या हालचाली सुरू आहेत.
सोमवारची महासभा संपल्यानंतर गटनेते श्री. जामदार यांनी कांबळे यांची भेट घेऊन याची आठवण करून दिली होती. मात्र असा कोणताही शब्द पाटील यांनी दिला नसल्याचे सांगत कांबळे यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
महापालिकेच्या महापौरपदासाठी पहिली अडीच वष्रे आरक्षित असून हा कालावधी फेब्रुवारी २०१६ पर्यंत आहे. यामुळे निवडीनंतर आठ महिने कांबळे यांना आणि उर्वरित सहा महिने दोघांना संधी द्यायची अशी तडजोड झाल्याचा दावा महापालिकेतील काँग्रेसचा एक गट करीत आहे. यातूनच महापौरांना राजीनामा देण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे या गटाचे म्हणणे आहे.
मात्र या सल्ल्याला काडीची किंमत देणार नाही असे सांगत श्री. कांबळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आपणास मदन पाटील व आ. डॉ. पतंगराव कदम यांनी महापौरपद दिले असून तसे काहीच ठरले नव्हते असे सांगत आपणास राजीनामा देण्याचा आदेश केवळ डॉ. कदमच देऊ शकतात असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. याबाबत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनीही अद्याप तसे काहीही सांगितलेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळावर एका सदस्याची शिफारस महापालिकेने करायची असून या सदस्याच्या नावाचा ठराव महासभेत होऊ शकला नाही. या पदासाठी महापौर कांबळे हे इच्छुक असले तरी पक्षांतर्गत एकमत त्यांना होऊ शकले नाही. ऐनवेळी आपल्या नावाची शिफारस करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पक्ष बठकीत हा ठराव बारगळला. माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर बाजार समितीच्या संचालक सदस्यत्वासाठी इच्छुक असून त्यांनी आपल्या नावाचा आग्रह या बठकीत धरल्याने हा विषय स्थगित ठेवण्यात आला. याबाबत जयश्रीताई पाटील याच निर्णय घेतील असे सांगत तात्पुरता या विषयावर पडदा टाकण्यात आला आहे.