सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढविणाऱया राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या पराभव सामोरे जावे लागले आहे. गेल्यावेळी महाआघाडी करून कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने धोबीपछाड दिला आहे.
एकूण ७६ जागांवर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांनी ४० जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी कॉंग्रसचे उमेदवार १७ जागांवर विजयी झालेत. स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार ९ जागांवर विजयी झाले आहेत. मनसेनेही या निवडणुकीत आपले खाते उघडले असून, पक्षाचा एक उमेदवार निवडणुकीत विजयी झाला. १० ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ६८ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीच्या प्रचारावेळी नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे तणावग्रस्त झालेल्या या महापालिकेच्या मतदान प्रक्रियेत अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही काही भागात दगडफेक आणि बाचाबाचीचे प्रकार घडले होते.