आíथक घडी अव्यवस्थित असल्याने सांगली महापालिका स्मार्ट सिटी योजनेच्या परीक्षेत नापास ठरली. स्वयंमूल्यांकनात आणि आराखडा सादरीकरणात चांगले गुण मिळवूनही स्मार्ट सिटीच्या योजनेतून सांगली महापालिकेच्या नशिबी प्रतीक्षाच आली आहे.
सांगली महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीत समावेश व्हावा यासाठी स्वयंमूल्यांकन करीत आराखडा सादर केला होता. स्वयंमूल्यांकनात महापालिकेला ५७ गुण मिळाले होते. आयुक्त अजिज कारचे यांच्या टीमने नगरविकास मंत्रालयाला आराखडा सादर केला. महापालिकेच्या भविष्यकालीन योजनांबरोबरच उत्पन्नाचे स्रोत आणि विविध विकासकामांची माहिती स्वतंत्रपणे सादर केली. यानंतर महापालिकेच्या आराखडय़ावर ८७.५ गुण लाभले. यामुळे स्मार्ट सिटीच्या पहिल्या २० यादीत स्थान मिळाले असले तरी १७ वा क्रमांक होता.
राज्य शासनाने केंद्राला धाडलेल्या यादीत १० शहरांची निवड केली असून यामध्ये सांगलीचा नंबर लागू शकला नाही. स्मार्ट सिटीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक बाबींची कमतरता आढळून आली. यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच आíथक स्थितीही महत्त्वाची ठरली. वसुलीत हयगय हे एक प्रमुख कारण ठरलेच, पण कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न मिळण्याचे कारणही नापास होण्यामागे ठरले. याशिवाय महापालिकेकडून अत्याधुनिक ई-गव्हर्नस योजना गुंडाळल्याचा परिणामही कारणीभूत ठरला. शेरीनाल्यामुळे होणारे प्रदूषण आदी कारणामुळे महापालिका या स्मार्ट सिटीच्या परीक्षेत नापास झाली आहे.
याशिवाय महापालिकेच्या आमसभेत ज्यावेळी या विषयावर चर्चा सुरू होती त्यावेळी सदस्यांनीही या योजनेत समावेश होण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी नसल्याचे निदर्शनास आणून देत पहिली पास होण्याची रड तिथे एमपीएससीची परीक्षा देण्याची तयारी असल्याची टीकाही झाली होती.