बेकायदा फलक काढल्याच्या रागातून कार्यालयांची मोडतोड, अधिकाऱ्याला मारहाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात लावण्यात आलेले बेकायदा फलक जयंती झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने काढल्यावरून सोमवारी दुपारी दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका इमारतीत मोडतोड केली. महापालिका कार्यालयांची मोडतोड करण्याबरोबरच, वस्तूंची नासधूस करत एका अधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. हा हल्ला आणि मारहाणीच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले.  पालिका प्रशासनाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात एका ठिकाणी बेकायदा लावलेला मोठा फलक जयंती झाल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढला. या वेळी काहींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. हे फलक जप्त करून नेल्यावर कार्यकर्त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा फलक लावला. या वेळी पालिकेचे कर्मचारी पुन्हा हे फलक जप्त करण्यासाठी आले असता त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी पळवून लावले. तसेच त्यांनी सोमवारी पालिकेत जाऊन ही कारवाई का केली असा जाब विचारला. या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयांची मोडतोड, वस्तूंची नासधूस केली. तेथील खुच्र्र्याची व संगणकांची मोडतोड केली. खिडक्यांच्या काचा फोडल्या. कार्यालयातील फाईलीही भिरकावल्या. तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे  यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढून पालिकेला कुलूप ठोकले. पालिकेला चारही बाजूने पोलिसांनी वेढा दिला होता.

दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख घोरपडे यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी कर्मचाऱ्यांनी मागणी केली. मोडतोड आणि मारहाणीबद्दल पालिका प्रशासनाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बेकायदा फलक व अतिक्रमण काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आयुक्त या नात्याने प्रशासनाने दिल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या सूचना असल्याने त्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकरणात कोणाचेही दडपण अथवा दबाव खपवून घेतला जाणार नाही. हे असे बेकायदा फलक पुन्हा उभे करणाऱ्यांवर तसेच पोलिकेत गोंधळ, मोडतोड, हाणामारी करण्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 – रवींद्र खेबुडकर, आयुक्त