कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी. गावातील गुन्हे कमी कसे होतील, घरफोडय़ा कशा थांबतील, लूटमारीला कसा अटकाव होईल, हे पाहणे हे पोलिसांचे काम. तरीही घरफोडय़ा आणि लूटमार होतेच. परगावी जाणाऱ्या नागरिकांना तर घराची काळजी मनात ठेवूनच घर सोडावे लागते. या पाश्र्वभूमीवर घरफोडय़ाच होऊ देणार नाही, अशी हमी न देता सांगली जिल्ह्य़ातील पोलिसांनी घरातले दागिनेच काही काळ सांभाळण्याची अभिनव तयारी दाखवल्याने नागरिकही चक्रावले आहेत.
लोकांनी बँकांमधील लॉकरमध्येच दागिने व मौल्यवान वस्तू ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असे सांगत आता ही सवय लोकांना लागावी म्हणून हा उपक्रम पोलिसांनीच सुरू केल्याचे सांगण्यात येते. सांगली जिल्हा पोलीस दलाने आपल्या कक्षात अशा प्रकारचा ‘सुरक्षा कक्ष’ उघडण्याचा निर्णय घेतला असून बाहेरगावी जाणाऱ्या लोकांनी इथे त्यांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवाव्यात, असे आवाहन केले आहे. पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी याबाबत माहिती दिली.
अचानक परगावी जाण्याची वेळ आली, अथवा पर्यटनासाठी चार-आठ दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली, तर अनेक जण बँकेत ‘लॉकर’मध्ये दागिने ठेवण्यापेक्षा घरातील तिजोरीत ते ठेवतात. अशा वेळी बंद घरांवर पाळत ठेवून चोरीच्या घटना घडतात. आयुष्यभराची पुंजी अज्ञात चोरटे एखाद्या बेसावध क्षणाचा लाभ उठवीत लंपास करतात. त्यामुळे अल्प कालावधीसाठी हे दागिने सांभाळण्याची तयारी पोलीस खात्याने दर्शवली आहे!
परगावी जात असताना आपले दागिने एखाद्या पिशवीत बंदिस्त करून जिल्हा मुख्यालयात निर्माण करण्यात येत असलेल्या विशेष कक्षाच्या ताब्यात ते द्यावेत. त्याची पावतीही दिली जाईल. यासाठी राखीव पोलीस निरीक्षकांच्या अधिकारात स्वतंत्र पथक तनात केले जाणार आहे. ही सुविधा अल्प काळासाठी असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपला ऐवज सुरक्षित ठेवावा, असे आवाहन सांगली पोलिसांनी केले आहे.
असे असले तरी आपले दागिने पोलीस ठाण्यात ठेवताना नस्ती कटकट निर्माण होणार नाही ना, अशीही धास्ती काही नागरिकांना वाटते आहे. हे दागिने आपलेच असल्याचा पुरावा द्यावा लागेल का, ते परत घेण्याची प्रक्रियाही सुलभ असेल का, असेही प्रश्न चर्चेत आहेत.