11 December 2017

News Flash

भाविकांवर काळाचा घाला, मिरज- पंढरपूर मार्गावरील अपघातात ६ जणांचा मृत्यू

अपघातग्रस्त बसमधील प्रवासी कोल्हापूरच्या माले गावातील रहिवासी

सांगली | Updated: April 21, 2017 10:32 AM

मिरज- पंढरपूर मार्गावर शुक्रवारी पहाटे मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

पंढरपूरवरुन देवदर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. सांगलीत मिरज- पंढरपूर मार्गावर मिनी बस आणि ट्रकच्या अपघातात मिनी बसमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत.

कोल्हापूरच्या माले गावातील भाविक विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. देवदर्शनकरुन परतत असताना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मिरज – पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी बसने रस्त्यालगत थांबलेल्या वाळूच्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात सहा भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला, दोन लहान मुले आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या १० प्रवाशांवर मिरजमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताच्या वृत्तानंतर कोल्हापूरच्या माले गावात शोककळा पसरली आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अपघातात नंदकुमार हेडगे (वय ३७), रेणुका हेगडे (वय ३५), आदित्य हेगडे (वय १२), लखन राजू संकाजी (वय २६), विनायक लोंढे (वय ४०) आणि गौरव नरदे (वय ७) यांचा मृत्यू झाला. जखमींपैकी रेखा देवकुळे, स्नेहल हेगडे (वय २०) आणि काजल हेगडे (वय १९) यांची प्रकृती गंभीर आहे. तर  सावित्री आवळे (वय ५५), शीतल हेगडे (वय ४२), सोनल कांबळे (वय ३६), कोमल हेगडे (वय २०), कल्पना बाबर (वय ४०), अनमोल हेगडे (वय १२), गौरी हेगडे (वय ७), शुभम कांबळे (वय १०) अशी या अपघातातील अन्य जखमींची नावे आहेत. चालक संदीप यादव हा घटनेनंतर पसार झाला आहे. बसमधील भाविक हे सोमवारी देवदर्शनासाठी निघाले होते. विजापूर, अलमट्टी, तुळजापूरकरुन ते पंढरपूरला गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात झाला.

First Published on April 21, 2017 8:50 am

Web Title: sangli six devotees killed in road accident on miraj pandharpur highway