News Flash

सांगलीत महापुराने कोटय़वधींचे नुकसान

जिल्ह्य़ातील महापालिका आणि कृष्णा व वारणा नदीकाठच्या १०२ गावांना यंदाच्या महापुराचा फटका बसला.

सांगलीत महापुराने कोटय़वधींचे नुकसान

दिगंबर शिंदे, लोकसत्ता 
सांगली :  यापूर्वी आलेल्या २०१९ च्या महापुरातून सावरत असतानाच गेली दोन वर्षे करोनाने सांगलीकरांना जेरीस आणले होते. यातच आता पुन्हा महापुराचे संकट कोलमडून नव्हे तर उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरते की काय अशी भीती आजच्या घडीला सांगलीकरांच्या मनात आहे. २००५ नंतर दोन वर्षांनी २००७ मध्ये महापूर आला होता. आता दोन वर्षांच्या फरकाने पुन्हा एकदा निम्मी सांगली पाण्याखाली गेली. तत्कालीन राजकर्त्यांनी महापुराचे खापर अलमट्टी धरणातील पाणीसाठय़ावर फोडले होते.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीची बाजारपेठ महत्त्वाची मानली जाते. सांगलीच्या हळदीने जागतिक पातळीवर स्थान पटकावले आहे. द्राक्षाबरोबरच बेदाणा, गूळ या शेतीमालाची प्रमुख बाजारपेठ म्हणून असलेली ओळख महापुरासारख्या नैसर्गिक संकटामुळे व्यापार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरतील की काय अशी शंका येत आहे.

यंदा अतिमुसळधार पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडू लागताच प्रशासनाने सतर्कता बाळगत लोकांनाही जागे केले. मात्र सांगलीत पाणी पातळी ५१ ते ५२ फू ट राहील असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वर्तवला गेला. यापूर्वीच्या महापुराची निशाणी लक्षात ठेवून लोकांनीही दक्षता घेत स्थलांतर केले. स्थलांतर करीत असताना घरातील संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडणार नाही या पध्दतीने ठेवले. मात्र प्रशासनाचा अंदाज अखेर चुकलाच. अंदाजापेक्षा दोन-अडीच फुटांनी पाणी जास्त आले आणि उतारही अत्यंत संथगतीने होत आहे. याचाही फटका बसला.

मात्र दोन वर्षांपूर्वीचा महापुराचा अनुभव गाठीशी असल्याने प्रशासन जसे सतर्क होते, तसेच लोकही सतर्क होते. ऐनवेळी घराबाहेर पडले नाही तर नाकातोंडात पाणी जाण्याचा धोका ओळखून लोकांनीच आपली व्यवस्था केली होती. आर्थिक हानी जरी झाली असली तरी जीवितहानी वाचविण्यात प्रशासनाबरोबरच लोकांनाही यश आले हेही महत्त्वाचेच म्हणायला हवे.

एकशे दोन गावांना फटका

जिल्ह्य़ातील महापालिका आणि कृष्णा व वारणा नदीकाठच्या १०२ गावांना यंदाच्या महापुराचा फटका बसला. सुमारे ३० हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली असून नुकसानीचा अंदाज किमान अडीच हजार कोटींवर जाण्याची शक्यता दिसत आहे. अद्याप शासकीय पाहणीच अहवाल यायचे आहेत. याचबरोबर सातत्याने तीन दिवस, अतिमुसळधार पाऊस कोसळल्याने रस्त्यांचीही प्रचंड हानी झाली आहे. रस्ते, वीज यंत्रणा, पाणीपुरवठा योजना यांचीही हानी झाली आहे. याची गणती नजीकच्या काळात होईल, मात्र भरपाई होण्यास पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीची वाट पाहावी लागेल अशी भीती सामान्यांच्या मनात आहे.

अलीकडच्या काळात महापुरासारख्या आपत्ती वारंवार का येत आहेत याचा तज्ज्ञांकडून अभ्यास होण्याची गरज आहे. कोयना, चांदोली ही मोठी धरणे सांगलीच्या माथ्यावर आहेत. यातून होत असलेला विसर्ग आणि वाहून जाण्यासाठी नद्यांचे अरुंद पात्र ही तर कारणे आहेतच, पण याचबरोबर नैसर्गिक प्रवाहामध्ये होत असलेले अतिक्रमणे हेही कारण आहे. पूरपट्टा वेळोवेळी निश्चित केला जातो. मात्र या पूरपट्टय़ात बांधकामे होऊ नयेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा जरी असल्या तरी शहर केंद्रित विकासाची व्याख्या नव्याने तपासण्याची गरज आहे. शहरांचा नियोजनबद्ध विकास करीत असताना ज्या ठिकाणी खुल्या, नापेर जमिनी आहेत त्या ठिकाणी वसाहत निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवा. सांगलीला महापुराचा धोका असतानाही पूरपट्टय़ात आयुक्त निवास उभारण्याची घाई प्रशासनच करत असेल तर नियोजनबद्ध विकासाची अपेक्षा कोणाकडून करायची?

नदीपात्रातील पाणी संथगतीने का उतरते याचा अभ्यास होण्याची गरज आहे. राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी नियुक्त केलेल्या सांगली-कोल्हापूर महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या वडनेरे समितीचा अहवाल अजून का स्वीकारला गेला नाही. या अहवालाने नैसर्गिक नाल्यावर होत असलेल्या अतिक्रमणावर बोट ठेवले आहे. याकडे दुर्लक्ष का केले जाते? याचे परिणाम एकटय़ा सांगली, कोल्हापूर शहरालाच भोगावे लागतात असे नाही तर अख्ख्या जिल्ह्य़ातील लोकांना भोगावे लागतात.

महापूर ओसरल्यानंतर प्रमुख आव्हान असणार आहे ते स्वच्छतेचे. यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर तात्काळ महापालिकेने स्वच्छतेला प्राधान्य दिले असून येत्या दोन दिवसांत मुंबई, पुणे महापालिकेच्या यंत्रणेच्या सहकार्याने चार दिवसांत पूर्ववत स्थिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे

– राहुल रोकड, उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 1:51 am

Web Title: sangli suffer crores of rupees loss due to floods zws 70
Next Stories
1 अकोल्यात १४ वर्षांपासून स्वतंत्र सामान्य रुग्णालयाची प्रतीक्षा
2 यंदा इथेनॉलचे उत्पादन तिप्पट?
3 माध्यमिक शिक्षक सोसायटी सभेत गोंधळ
Just Now!
X