मिरज-सांगली रस्त्यावरील बेथेलनगरमध्ये सापडलेली ३ कोटींची रोकड आली कुठून याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील वारण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातून आरोपी मोहिद्दीन मुल्ला याने ही रक्कम चोरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांच्या कार्यालयातून ही रक्कम चोरल्याचे तपासात पुढे आले आहे. सरनोबत यांनी स्वतः याला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरनोबत यांनी एका व्यवहारासाठी ती रक्कम २८ फेब्रुवारीला कार्यालयातील तिजोरीत ठेवली होती. त्यानंतर ते कार्यालयात गेलेले नाहीत. त्या काळात मुल्ला याने कार्यालयातील तिजोरीतून तीन कोटींची रक्कम चोरली आणि बेथेलनगरमधील आपल्या झोपडीमध्ये आणून ठेवली. पोलिसांनी मुल्लाकडे कसून चौकशी केल्यावर त्याने सरनोबत यांच्या कार्यालयातून ती रक्कम चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनीच सरनोबत यांना या चोरीबद्दल माहिती दिली. तिजोरीतून चोरलेल्या सर्व रकमेचा आपल्याकडे हिशेब असून, प्राप्तिकर कार्यालयाकडे आपण त्या रकमेवर दावा करणार असल्याचे सरनोबत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
मुल्ला यांच्याकडून जप्त करण्यात आलेली रक्कम पोलिसांनी यापूर्वीच प्राप्तिकर विभागाकडे दिली आहे. मुल्लाकडे नवीकोरी बुलेट आढळल्याने संशयावरून हे घबाड पोलिसांच्या हाती लागले होते. गेल्या शनिवारी ३ कोटी ७ लाख ६३ हजार ५०० रूपयांची बेनामी रोकड पोलिसांच्या हाती लागली. मुल्ला हा पन्हाळा तालुक्यातील जाखलेचा रहिवासी आहे. झोपडीवजा पत्र्याच्या घरामध्ये सुटकेसमध्ये हजार व पाचशे रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम आढळली होती.