पालकमंत्री देशमुखांविरोधातही नाराजी

सांगली : सांगलीत शुक्रवारी पूरपाहणीवेळी ‘सेल्फी’ प्रकरणामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात रोष व्यक्त करण्यात येत होता. दुसरीकडे, पूरग्रस्त महापुराशी लढत असताना पूरपाहणी करून त्यांना मदत करण्यात विलंब झाल्याबद्दल पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबद्दलही संताप आहे.

सांगली गेले चार दिवस जलप्रलयाशी झुंजत आहे. वीज नाही, अन्न-पाणी नाही, अशा स्थितीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सांगलीचा पूरपाहणी दौरा केला. बचावकार्याची एक बोट त्यांच्या दिमतीला होती. या बोटीत बसून ते पूरपाहणी करीत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरली आहे. पुराचे पाणी दिसू दे; ही चित्रफीत मुख्यमंत्र्यांना पाठवायची आहे, असे महाजन चित्रीकरण करणाऱ्याला सांगत असल्याचे ऐकू येत आहे. त्या वेळी त्यांची हास्यमुद्रा पाहून मंत्री मदतीसाठी आले की पूरपर्यटनासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हेही पूर पाहणीसाठी येणार असल्याचे माध्यमांना गुरुवारीच सांगण्यात आले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे यंत्रणा तोकडी आहे. तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाला गती देण्याची जबाबदारी असतानाही  पालकमंत्री सांगलीकडे फिरकले नाहीत. शुक्रवारी त्यांनी पूरपाहणी केली. या विलंबाबद्दलही तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.