सांगलीत महिलावर्ग दागिने बनविण्यात गर्क

सांगली : नव दांपत्याचे कौतुक आणि लहान मुलांचे बोरन्हाणं करण्यासाठी लागणाऱ्या हलव्याचे नावीन्यपूर्ण दागिने तयार करण्याच्या कामात सांगलीत महिलावर्ग गर्क असून अगदी अमेरिकेतूनही या दागिन्यांना मागणी असल्याचे विनीता गोरे यांनी सांगितले.

काही कुटुंबांमध्ये नवीन विवाह झालेल्या लेकीचे आणि जावयाचे संक्रातीच्या वेळी वाण देण्याबरोबरच हलव्याचे दागिने घालून कौतुक करण्याची परंपरा जोपासली जाते. तसेच याच वेळी पाच वर्षांचे वय होईपर्यंत लहान मुलाचे बोरन्हाणं करण्याची प्रथाही पाळण्यात येते. संक्रातीपासून रथ सप्तमीपर्यंत हा विधी साजरा करण्यात येतो. या वेळी नववधूला काळी साडी वाण म्हणून दिली जाते, तर या काळ्या साडीवर हलव्याचे दागिने परिधान करण्यास सांगण्यात येते. यामुळे सौंदर्य अधिकच खुलते अशी धारणा महिला वर्गाची असल्याचे श्रीमती गोरे यांनी सांगितले.

गावभागामध्ये घरीच श्रीमती गोरे या हलव्याचे दागिने तयार करतात. यासाठी चार महिला त्यांना गेले काही महिन्यापासून मदत करतात. हलव्याच्या दागिन्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबादबरोबरच अमेरिकेतूनही मागणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लहान मुलाच्या दागिन्यासाठी साडेचारशे ते एक हजार, जावयाच्या दागिन्यासाठी एक हजार तर महिलांच्या दागिन्यासाठी दोन हजारांपासून तीन हजारांपर्यंत खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. चांगली कलाकुसर, मनमोहक रंगसंगती आणि नावीन्यपूर्ण हलव्याचे दागिने हे सांगलीचे वैशिष्टय़ असून संपूर्णपणे घरगुती व्यवसाय असल्याचे श्रीमती गोरे म्हणाल्या.