प्रत्येक जण स्वबळाची भाषा बोलत असले तरी सोयीस्कर भूमिकेतून स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा विचार प्राथमिक पातळीवर तर दिसत आहे. राष्ट्रवादी एकीकडे स्वबळाची भाषा बोलत असली तरी दुसरीकडे समविचारी म्हणून काँग्रेसशी आघाडी करण्याच्या तयारीत आहे. तर आघाडीचे काही का होईना असे म्हणत, खानापूर, शिराळ्यात दोन्ही काँग्रेस एका तंबूत आले आहेत.

जिल्हा परिषदेवर गेली १५ वष्रे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता जाण्याची चिन्हे दिसू लागताच राष्ट्रवादीचे पाय आता जमिनीवर येऊ लागले असून स्वबळाची खुमखुमी कमी झाल्याचे दिसत आहे. विधान परिषद, नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीमध्ये आलेले अपयश याला कारणीभूत असले तरी मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेसला सोबत घेण्यात अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम हे स्वबळाचा नारा देत असले तरी त्यांच्याच पक्षाने आमदार जयंत पाटील यांच्या वाळव्यातील वर्चस्वाला हादरा देण्यासाठी भाजप, स्वाभिमानी विकास आघाडीत सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे, तर शिराळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना वावडे वाटत नाही. खानापूर-विटय़ात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आहेत, मग अन्य ठिकाणी का नाही याचा विचार सामान्यांना पडला आहे.

राष्ट्रवादीची भूमिकाही यापेक्षा वेगळी दिसत नाही. एकीकडे जातीयवादी ठरवून भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सत्तेपासून रोखण्यासाठी समविचारींना सोबत घेण्याची तयारी दर्शवली जात आहे. मात्र मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यात भाजपचे अजितराव घोरपडे यांच्याशी मत्री करण्याचे सूतोवाच केले जात आहे. मिरज पश्चिम भागात स्वाभिमानी शेतकरी संघटना रुजत असून यातच शिवसेनाही प्रयत्नशील आहे.

वाळव्यात आमदार जयंत पाटील यांना घेरण्याची सर्वच राजकीय पक्षांची इच्छा असली तरी अन्य तालुक्यांत त्यांची मदत हवी आहे. तासगावमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या अपेक्षेने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार नाही असे राजकीय आडाखे विधान परिषदेवेळीच मांडण्यात आले आहेत. तर जतमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत यांचे आव्हान भाजपला असेल, मात्र राष्ट्रवादी या ठिकाणी फारसे आशादायी चित्र सध्या तरी दर्शवीत नाही.

मातबर रिंगणात

जिल्हा परिषदेच्या ६० जागा असून या वेळी अध्यक्षपद खुले असल्याने अनेक मातबर निवडणुकीच्या िरगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हा परिषदेवर भाजपही झेंडा फडकाविण्याच्या तयारीत असली तरी या तिघांच्या लढती चुरशीच्या की मत्रीच्या हे उमेदवारी कशी जाहीर केली जाते यावर स्पष्ट होणार आहेत. कारण सर्वच राजकीय नेत्यांचे लागेबांधे एकमेकाशी निगडित आहेत. जिल्हा परिषदेसाठी एकमेकाविरुद्ध असलेले जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये एकत्र येतात.

तासगावमध्ये नगरपालिका विजयानंतर खा. संजयकाका पाटील यांना पंचायत समितीची सत्ता आणि जिल्हा परिषदेत वर्चस्व हवे आहे. मात्र जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी पुन्हा एकमेकांना आधार देत पुढे वाटचाल होत राहण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढच्या हालचालीला वाव असावा असाच प्रयत्न निवडणुकीपूर्व मोच्रेबांधणीवेळी दिसून येत आहे.

काँग्रेसच्या प्रचाराची सूत्रे डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम, दादा घराण्यातील प्रतिक पाटील, विशाल पाटील यांच्याकडे राहतील, तर राष्ट्रवादीला प्रथमच आर. आर. आबांची उणीव जाणवत असून प्रचाराची सारी मदार आ. जयंत पाटील यांच्यावरच राहणार आहे. मात्र या तोडीस एक खासदार, चार आमदार भाजप मदानात उतरत आहे. याला अर्थातच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची साथ असणार आहे.