16 December 2019

News Flash

सांगलीतील गुन्हेगारी वाढली, पोलीस यंत्रणा ढिम्म

तीन जणांची हत्या, तर दोन झुंडबळी

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

सांगली शहर सध्या खून, खुनाचे प्रयत्न यामुळे चर्चेत आहे. अगदी किरकोळ कारणातून खुनासारखे प्रकार राजरोस आणि भरदिवसा घडत असतानाही पोलीस यंत्रणा मात्र खुनाचे होणारे प्रकार हे वैयक्तिक कारणातून होत असल्याचे सांगून शहामृगासारखे डोके वाळूत खुपसून शत्रू नाहीच अशा भ्रमात आहे. सावकारीचा जाच, वाळू तस्करी आणि अवैध व्यवसायाने खुला बाजार मांडला असतानाही पोलीस अधिकारी मात्र मी कसा स्वच्छ आहे हे सांगण्यात मश्गूल असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम राजकीय नेतृत्वाचा अभाव हेच मोठे जिल्हय़ाचे दुर्दैव ठरू पाहात आहे.

गेल्या आठवडय़ात सांगली शहरात आणि आसपास सलग तीन खून झाले, तर गर्दी मारामारीचे प्रकार नित्याचेच ठरले आहेत. जून महिन्याच्या तीन सप्ताहात जिल्हय़ात सहा जणांची हत्या वेगवेगळ्या कारणांमुळे झाली. झुंड बळीचा प्रकार घडूनही संघटित गुन्हेगारी प्रबळ नसल्याचा पोलिसांचा दावाही हास्यास्पद आहे.

हरिपूर येथे अपघातामध्ये झालेल्या अपघातात एका बालिकेचा बळी गेला. या कारणावरून संतप्त झालेल्या जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रकवर क्लीनर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण करण्याचा प्रकार या महिन्याच्या प्रारंभी घडला. हा प्रकार घडल्यानंतर संशयितांना जेरबंद करण्यात आले. मात्र एका क्लीनरची कोणतीही चूक नसताना जीव गमवावा लागला याचे कोणालाच काही वाटू नये यासारखे दुर्दैव अन्य कोणते नाही. ज्या बालिकेचा बळी गेला त्याबद्दल संबंधित ट्रकचालकाविरुद्ध  कायदेशीर कारवाईचा मार्ग खुला असतानाही अंतिम क्षणी राजकीय दबावातून तपास कामात हस्तक्षेप करण्याचा प्रकारही चिंताजनकच म्हणावा लागेल. अपघातग्रस्त क्रमांकाचे दोन मालट्रक आणि तेही एकाच गावात आढळणे, त्याबाबत फारशी चर्चाही न होणे, हे कोणत्या कायद्याच्या कक्षेत बसते, याचे उत्तर ना पोलीस यंत्रणेकडे ना व्यवस्थेकडे? वाळू आणि माती चोरीतून सुटका होण्यासाठी आणि शासनाच्या परिवहन विभागाचा महसूल चुकविण्यासाठी एकाच क्रमांकावर दोन दोन ट्रक रस्त्यावर फिरू शकतात. मात्र याला आळा घालण्याची गरज आहे. मात्र या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे घातक आहे. अवैध माती व वाळू वाहतुकीत या नकली वाहन क्रमांकाचा होत असलेला वापर रोखणे सहजशक्य आहे. इच्छाशक्तीची गरज आहे.

याचबरोबर गेल्या आठवडय़ामध्ये वाळवा तालुक्यातील कासेगावमध्ये एका तरुणाची शिवीगाळ केली या कारणावरून जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली. या झुंडबळीच्या घटना घडल्या. तर संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुभाष बुवा या सामाजिक कार्यकर्त्यांची घरातून बाहेर बोलावून तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. जमीर पठाण या हॉटेल व्यावसायिकाची हत्या होऊन १२ तास होत नाहीत तोवर मालगावमध्ये एका पारधी तरुणाची हत्या नातेवाईकांकडून करण्यात आली. या हत्येचा पंचनामा होण्यापूर्वीच पुन्हा सांगली शहरात खुनाचा प्रकार समोर आला.

सांगली शहरातील संजयनगर, मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, तासगाव, जत आणि उमदी ही गुन्हेगारीचा आलेख वाढविणारी ठाणी ठरली आहेत.  या गुन्हेगारीवर देखरेख ठेवण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असताना आणि वेळोवेळी हद्दपारीची कारवाई केली जात असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध  करूनही पोलीस यंत्रणा कुचकामी का ठरते, याचे उत्तर यंत्रणेकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. शहरातील जुगार हद्दपार झालेला नाही.

झालेल्या हत्या या वैयक्तिक कारणातून झाल्या असल्याचा दावा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. यामुळे या घटनांचा समाजस्वास्थ्यावर काहीही परिणाम होत नसल्याचा त्यांचा दावा आहे.

जिल्हय़ातील तासगावसारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांचा खो-खोचा खेळ सुरू आहे. एक अधिकारी सहा महिनेही थांबू इच्छित नाही. या उलट वाहतुकीसह काही मोजकी पोलीस ठाणी मिळविण्यासाठी अधिकारी वर्गामध्ये चढाओढ सुरू असते.

राजकीय आश्रयाखाली सावकारी?

तासगावमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची २५ लाखाची दिवसाढवळ्या लूट करण्यात आली. या घटनेला आठ दिवसांचा अवधी झाला तरी अद्याप गुन्हेगार मोकाट आहेत. बाजारात मोबाइल चोरीसारखे प्रकार हमखास घडत असताना पोलीस ठाण्याचे गुन्हेअन्वेषण विभागाचे कर्मचारी काय करीत आहेत याचे उत्तर ठाणे प्रभारीकडे नाही. सावकारीचा विषय तर वेगळाच, राजकीय कृपाछत्राखाली सावकारीचे प्रस्थ वाढले आहे. अनेक राजकीय कार्यकत्रे विनासायास मिळकतीचा व्यवसाय म्हणून याकडे वळले आहेत. सांगली शहरात तर सायंकाळच्यावेळी गटा-गटाने हे व्यावसायिक वसुलीबाबत चर्चा करीत थांबलेले पाहण्यास मिळतात, मात्र पोलिसांना हे दिसत नाही. यातून धमकावणे, मालमत्ता हडप करणे हे प्रकार राजरोसपणे घडत आहेत.

First Published on June 26, 2019 1:13 am

Web Title: sanglis crime grew abn 97
Just Now!
X