सांगोला (जि. सोलापूर) शहरात बुधवारी रात्री भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगोला पोलिसांना शहरातील एसटी स्टँडसमोरील यशश्री हॉटेल शेजारील एका खोलीत भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असेल्या सामन्यावर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या ठिकाणी धाड टाकली असता अण्णा नाना बनकर, अशोक तात्याराम यलपल्ले, सुनील नारायण गोडसे, राजेश भगवान खडतरे, संतोष प्रभाकर मदने (सर्व रा. सांगोला) हे सट्टा घेत असताना आढळले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर सट्टा चालवणारा विशाल गुटूगुडे व हॉटेलचा मालक सिद्धेश्वर जाधव जाधव (रा. सांगोला) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या विशेष टीमने ही कामगिरी केली. यामध्ये सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलिस नाईक अमृत खेडकर, अंकूश मोरे, मिलिंद कांबळे, प्रवीण पाटील, बाळराजे घाडगे, अमोल माने, नितीन चव्हाण, सुरेश लामजने, अमोल जाधव, पांडूरंग केंद्रे, महादेव लोंढे यांचा समावेश आहे.