डॉ. इंद्रजीत खांडेकर यांच्या अहवालातील निष्कर्ष

शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनीकडून वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील शिक्षण आयुक्तांना दिले आहे. एकीकडे राज्य शासन स्त्रियांच्या आरोग्याची काळजी म्हणून सॅनिटरी नॅपकीनचा पुरस्कार करीत आहे, पण त्याची विल्हेवाट योग्यप्रकारे न लावल्याने उद्भवणाऱ्या दुष्परिणामाबाबत उदासीनता असल्याची स्थिती सेवाग्रामचे डॉ. इंद्रजीत खांडेकर यांची एका अहवालातून  निदर्शनास आणली होती.

तसेच माहितीच्या अधिकारातून याविषयी शासन काय खबरदारी घेणार आहे, अशी विचारणाही केली होती. या विचारणेवर केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या विज्ञान अनुसंधान विभागाचे उपसंचालक आर.के. अहलुवालिया यांनी एका पत्राद्वारे शासनाची भूमिका डॉ. खांडेकरांकडे स्पष्ट केली. तसेच यासंबंधी २०१५ची नियमावली संकेतस्थळावर टाकण्याचेही सूचित केले असल्याचे स्पष्ट केले.

शाळा- महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट योग्यप्रकारे लावण्यासाठी कुठलीच शास्त्रीय पद्धत उपयोगात नाही. सध्याची विल्हेवाट शास्त्रीयदृष्टय़ा अयोग्य आहे. सर्वसामान्यांना तसेच शासकीय अधिकाऱ्यांना याबद्दल पुरेशी माहिती नाही. केंद्राच्या स्वच्छता विभागाने २०१५ मध्ये विल्हेवाट लावण्याची नियमावली तयार केली होती, पण अंमलबजावणीचे निर्देश नव्हते. यावर कार्यवाही व्हावी म्हणून डॉ. खांडेकर यांनी ही नियमावली निदर्शनास आणून देत केंद्र व राज्य शासनाने काय करणे अपेक्षित आहे, याविषयी स्पष्टीकरण विचारले होते.

यावर आता जागे होत राज्य शासनास सूचना करण्याचे पाऊल केंद्राने टाकले आहे. तसेच शाळा-  महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी बंदिस्त जागेतील कचराभट्टी सुरू करण्याबाबत राज्य शासनाने विचार करावा, असे मत आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे. शिवाय समुदाय पातळीवर नॅपकिन खोल खड्डय़ात पुरणे किंवा जाळणे, या दोन पर्यायाचा पर्यावरण विभागाच्या सल्लय़ाने अंमल करावा, असेही सुचवण्यात आले आहे.

विविध जाहिरातीमुळे या नॅपकिनचा वापर वाढत आहे, पण त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने ही बाब एक समस्या ठरत आहे. २०१५-१६च्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतातील ३० ते ३५ कोटी महिला नॅपकिनचा उपयोग करू लागल्या आहेत. १५ ते ५४ वयोगटातील १७ कोटी महिलांचा त्यात समावेश होतो. मासिक बारा नॅपकिन्स या हिशोबाने वापरलेल्या २०४ कोटी नॅपकिनचे वजन २३ हजार टन एवढे भरते. सर्वच महिलांमध्ये नॅपकिन वापरणे सुरू झाले तर हा कचरा किती भयावह स्वरूपात गोळा होईल, याचा अंदाज केलेला बरा, अशी टिपणी डॉ. खांडेकर यांनी केली. सद्यस्थितीत वापरलेले नॅपकिन्स कचरापेटीत किंवा शौचालयात टाकल्या जातात. किंवा नाल्यात, उघडय़ावर फेकून दिल्या जातात. ९० टक्क्य़ापेक्षा जास्त नॅपकिन्समध्ये जैविकरित्या विघटन होऊ न शकणाऱ्या क्रुड ऑईल पॉलिमरचा वापर होतो. ते नष्ट होण्यास शेकडो वर्ष लागतात. त्यावर पुनप्र्रक्रिया होऊ शकत नाही. परिणामी, पर्यावरणावर अत्यंत विपरीत परिणाम होतो. रोज होणाऱ्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे. मुक्या जनावरांच्या पोटात हा कचरा जातो. प्राण्यांचे आजार पसरतात. रोगराई पसरू शकते. हे धोके टाळण्यासाठी नॅपकिनची त्वरित विल्हेवाट लावणे आवश्यक ठरते, असे निदर्शनास आणण्यात आले होते. सरकारने ठोस उपाययोजना करावी, असे डॉ. खांडेकर यांनी सूचवले आहे. नॅपकिनची विल्हेवाट कशी लावावी, याविषयी शाळेच्या अभ्यासक्रमातच माहिती नमूद करावी म्हणून डॉ. खांडेकर तसेच त्यांचे विद्यार्थी आयुष कपूर, हेमा सत्या व रसिका भोंगाडे हे शासनाशी पत्राद्वारे पाठपुरावा करीत आहेत.