राज्य सरकारने अर्थसंकल्पात अस्मिता योजना जाहीर केली आहे. या योजनेला आजच कॅबिनेटही मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना ५ रुपयात ८ सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार आहेत. अस्मिता योजना ग्राम विकास खात्याच्या उमेद अभियानातर्फे राबवली जाणार आहे. देशात स्वच्छता अभियान सुरु आहेच. अशात महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील शाळकरी मुली आणि महिला यांना माफक दरात सॅनिटरी पॅड मिळू शकणार आहेत अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या मुलींना ५ रूपयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन दिले जाणार आहेत. या योजनेमुळे मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढेल. वर्षातले साधारण चाळीस ते पन्नास दिवस ग्रामीण भागातील मुली मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत जाऊ शकत नव्हत्या असेही समोर आले आहे. मात्र आता अस्मिता योजनेमुळे या दिवसातही त्यांना शाळेत जाता येणे शक्य होणार आहे असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या योजनेमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. तसेच त्यांचे आरोग्यही चांगले राहिल. सरकारने ही योजना मुख्यतः किशोरवयीन मुलींना डोळ्यासमोर ठेवूनच आखली आहे. ज्या प्रमाणे शाळेत जाणाऱ्या मुलांना मिड-डे मिल देण्यात येते त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना त्यांच्या आऱोग्यासाठी पाच रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महिला दिन अर्थात ८ मार्चपासून आम्ही ही योजना अंमलात आणणार आहोत असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. या योजनेचा दुसरा फायदा असा आहे की ही योजना बचतगटाच्या महिला राबवणार आहेत. त्यामुळे बचतगटातील महिलांना कामही मिळेल आणि किशोरवयीन मुली आणि महिलांचे आरोग्यही राखले जाईल असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

एकीकडे सॅनिटरी नॅपकिनवरचा जीएसटी कमी करण्याची मागणी जोर धरत असतानाच महाराष्ट्र सरकारने एक स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. अस्मिता योजनेमुळे अत्यंत माफक दरात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहेत.