राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांची माहिती

औरंगाबाद : राज्यातील नऊ महिला कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग यंत्र तसेच वापर झालेले पॅड जैविकरीत्या नष्ट करण्यासाठी बर्निंग यंत्र देण्यात येत आहे. शिक्षा पूर्ण केलेल्या महिलांना परत सर्वसामान्य आयुष्य जगता यावे, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हर्सूल कारागृहातील महिलांना लवकरच गरम पाण्यासाठी गिझर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी रविवारी येथे सांगितले.

वेंडिंग मशीन कारागृहात देताना सोबत ५० नॅपकिन आयोगामार्फत देण्यात येत आहेत. त्यानंतर वेंडिंग यंत्र आणि बर्निंग यंत्राची सुरक्षा व  देखभाल करणे, वेळोवेळी यंत्रामध्ये सॅनिटरी पॅडचा भरणा करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधणे याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असणार आहे. तसेच सॅनिटरी पॅड मोफत देणे किंवा अत्यल्प दरात देण्याबाबतचा निर्णय संबंधित कारागृह प्रशासनाचा असणार आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहाकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग यंत्राचे लोकार्पण आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आशिष गोसावी, महिला तुरुंग अधिकारी मेधा वाहेकर, सरपंच मंगलाताई वाहेगावकर, कारागृह शिक्षक एस. जी. गिते, पंचशिला चव्हाण, महिला रक्षक कल्पना जगताप, रेखा गडवे आदी उपस्थित होते.