करोना काळात एकीकडे वारंवार सॅनिटायचा वापर करा असं सांगितलं जात असताना कोल्हापुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी अंत आला आहे. एकीकडे करोनामुळे सॅनिटायझर लोकांच्या आयुष्याचा नित्याचा भाग होत असतानाच दुसरीकडे या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्य मात्र भीतीचं वातावरण आहे.

कागल तालुक्यातील बोरवडे भागातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. यावेळी त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे बाटलीचा स्फोट झाला आणि सुनीता काशीद आगीत होरपळल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.