अकोल्यात भाजपचे निíववाद वर्चस्व अबाधित

एकतर्फी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा दोन लाख ६९ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव करत भाजपचे संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात विजयी चौकार लगावला. तिरंगी लढतीत पुन्हा एकदा भाजपने विजयी पताका फडकावत मतदारसंघावरील आपले वर्चस्व अबाधित ठेवले. यावेळेस काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला. संजय धोत्रे यांची राज्यातील विक्रमी आघाडी आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पहिल्या फेरीपासून भाजपचे संजय धोत्रे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यात तिरंगी लढत झाली. ३०व्या फेरीअखेर संजय धोत्रे यांना पाच लाख ४३ हजार ०१३, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७३ हजार २३६, तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना दोन लाख ४७ हजार १५५ मते मिळाली. संजय धोत्रे यांनी दोन लाख ६९ हजार ७७७ मतांची विक्रमी निर्णायक आघाडी घेतली. नोटाला साडेआठ हजारांवर मते पडली. वृत्त लिहिस्तोवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, प्रशासनाकडून रात्री उशिरा अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र पापळकर यांनी काम पाहिले. यावेळी चोख व्यवस्थेसह कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तीन दशकांपासून अकोल्यात काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. केवळ १९९८ व १९९९ मध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत याच तीन उमेदवारांमध्येच लढत झाली होती. २०१४ मध्ये संजय धोत्रेंना चार लाख ५६ हजार ४७२ मते, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना दोन लाख ५३ हजार ३५६, तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना दोन लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली होती. संजय धोत्रेंनी हिदायत पटेल यांचा दोन लाख तीन हजार ११६ मतांनी पराभव करत हॅट्ट्रिक केली. या निवडणुकीत त्यांनी आपलाच विक्रम मोडीत काढत तब्बल पाच लाख ४३ हजारांवर मते घेऊन नवा पराक्रम केला आहे. या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.