संजय जाधव यांची दुसऱ्यांदा बाजी

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्याने पुन्हा एकदा परभणी लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विद्यमान खासदार संजय जाधव यांनी जिल्ह्यतील दोन्ही काँग्रेसच्या सर्व प्रस्थापित राजकीय नेत्यांविरूध्द कडवी झुंज देत आपला विजय खेचून आणला. पहिल्या फेरीपासूनच खा. जाधव आघाडीवर होते. शेवटपर्यंतही त्यांनी ही आघाडी कायम राखली. १२ लाख ५३ हजार ९२ मतांपैकी खासदार जाधव यांना ५ लाख ३८ हजार ९४१ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या विटेकर यांनी ४ लाख ९६ हजार ७४२ एवढी मते घेतली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीनेही १ लाख ४९ हजार ९४६ असा अनपेक्षित टप्पा गाठल्याने शिवसेनेचा मार्ग आणखी मोकळा झाला. ४२ हजार ५९९ मताधिक्याने खा. जाधव यांनी आपला विजय संपादित केला.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरूपात ‘व्हीव्हीपॅट’ची करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत शिवसेनेचे खा. संजय जाधव यांना २३ हजार ८३३, तर राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना १७ हजार ३१ एवढी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या आलमगीर खान यांनी ५ हजार ४८३ मते घेतली. पहिल्या फेरीपासूनच खासदार जाधव यांना मताधिक्य मिळत गेले. राष्ट्रवादीला पाथरी, परभणी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांनी दिलासा दिला असला तरीही गंगाखेडसह जिंतूर, घनसावंगी, परतूर या मतदारसंघांमध्ये धनुष्यबाणाने आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीअखेर खासदार जाधव ६६ हजार ३३२ मतांवर जाऊन पोहचले, तर विटेकर यांना ५१ हजार ४१५ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर खासदार जाधव यांनी १ लाख १० हजार मतांचा टप्पा गाठला, तर विटेकर मात्र ८५ हजारांवरच अडले. नंतरच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मतात सुधारणा झाली तरीही शिवसेनेची जोरदार मुसंडी सुरुच होती. बाराव्या फेरीअखेर शिवसेना २ लाख ४७ हजार १३० मतांवर पोहचली तर राष्ट्रवादीने २ लाख ३१ हजार २४५ मते मिळविली. सतराव्या फेरीत दोन्ही उमेदवारातील मतांमध्ये १४ हजारांचा फरक होता.