ख्यातनाम उद्योगपती संजय किर्लोस्कर यांनी कुटुंबियांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करून कोर्टात दाद मागितली आहे. संजय हे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून संपत्तीच्या वाटपासंदर्भात झालेल्या कराराचे पालन भावांनी केले नसल्यचा ठपका ठेवत त्यांनी ७५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा ठोकला आहे.

आपले भाऊ अतुल व राहूल तसेच लांबच्या नात्यातले भाऊ विक्रम व दिवंगत गौतम कुलकर्णी यांचे कुटुंबिय यांनी कौटुंबिक कराराची पायमल्ली केल्याचा आरोप संजय यांनी पुणे सिव्हिल कोर्टात केला आहे. पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार कुणी कुठला व्यवसाय करायचा याची निश्चिती या करारामध्ये करण्यात आली होती, मात्र आपल्या भावांनी हा करार न पाळल्याने व त्यांना मज्जाव असलेला व्यवसाय त्यांनी केल्यामुळे आपल्याला ७५० कोटी रुपयांचा फटका बसल्याचे संजय किर्लोस्कर यांचे म्हणणे आहे.

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर समुहाची स्थापना केली व अनेक नामांकित उद्योग उभे केले. किर्लोस्कर कुटुंबाच्या मालकिच्या कंपन्या कुटुंबातच रहाव्यात, वेगवेगळ्या वंशजांनी त्या चालवाव्यात व आपसात स्पर्धा होऊ नये या उद्देशाने २००९ मध्ये कौटुंबिक करार करण्यात आला. यानुसार कुणी कुठला व्यवसाय करायचा व कुठला नाही याची निश्चिती करण्यात आली. मात्र आपल्या भावांनी या कराराचे उल्लंघन केल्याचा दावा संजय यांनी कोर्टासमोर केला असून त्यामुळे आपले तब्बल ७५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

शंतनुरावांनी १९८९मध्ये मृत्यूपत्र केले होते, व किर्लोस्कर कुटुंबातील प्रत्येक शाखा कुठल्या व्यवसायावर नियंत्रण ठेवील याची रुपरेषा आखली होती. नंतर सदर करार करण्यात आला व त्यावर वर उल्लेखलेल्या सगळ्यांनी सह्या केल्याचे संजय यांनी म्हटले आहे. करारात ठरल्याप्रमाणे आपण आपलं कर्तव्य पार पाडले मात्र या भावांनी तो करार पाळला नाही व किर्लोस्कर ब्रदर्सला थेट स्पर्धा असलेल्या व्यवसायात त्यांनी उडी घेतल्याचा आरोप संजय किर्लोस्करांनी केला आहे.

महाराष्ट्रातील मोजक्या परंतु ख्यातनाम उद्योजकांमध्ये किर्लोस्करांची गणना होत असून या उद्योगाला कौटुंबिक वादांनी घेरल्याचे या प्रकरणामुळे दिसत आहे.