14 फेब्रुवारीला पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवानांना वीरमरण आले. या चाळीस शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील मलकापूरचे संजय राजपूत आणि लोणारचे नितीन राठोड या दोघांचा समावेश होता. या दोन्ही वीरपुत्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे! च्या घोषणा आणि साश्रू नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. दोन्ही वीरपुत्रांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेले मूळचे बुलडाण्याचे असलेले संजय राजपूत यांना अखेर निरोप मलकापूरमध्ये देण्यात आला. मलकापूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा मलकापूरवासीयांनी अलोट गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक मोठ्या संख्येने उभे होते. संजय राजपूत अमर रहे या घोषणांनी हा परिसर दुमदुमला. संजय राजपूत यांच्यानंतर त्यांची पत्नी, दोन मुलं आणि दोन भाऊ असा परिवार आहे. संजय राजपूत यांना मानवंदना देण्यासाठी मलकापूरच्या मुस्लिम बांधवांनीही रॅली काढली होती.

मलाकपूरच्या संजय राजपूत यांच्या प्रमाणेच नितीन राठोड यांनीही देशासाठी प्राण गमावले. नितीन राठोड यांचं पार्थिव दुपारच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी म्हणजेच लोणारमध्ये दाखल झालं. राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हाही अलोट गर्दी जमली होती. पंचक्रोशीतले लोक या अंत्यसंस्कारांसाठी हजर होते. नितीन ऱाठोड यांना गावातले लोक दादा म्हणत असत. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात लोणारचा दादा शहीद झाला त्यामुळे गावातल्या प्रत्येक घरातला सदस्य जणू हरपला अशीच भावना गावकऱ्यांच्या मनात होती. त्यांनाही साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.

दरम्यान भारताच्या फाळणीनंतर जन्माला आलेला पाकिस्तान हा देश म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. पुलवामात झालेल्या हल्ल्यातील भारताच्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. या हल्ल्याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि काय शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इशारा दिला. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जनतेच्या मनात आक्रोश आहे हे मी समजू शकतो. मात्र या शहीद जवानांचे बलिदान वाया जाणार नाही, दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई कऱण्यासाठई मी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे असेही मोदींनी सांगितले.