पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे प्रसारमाध्यमांसमोर किंवा कुठेही दिसले नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीला देखील संजय राठोड गैरहजर होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय वाढू लागला होता. मात्र, आज पोहरादेवीत दाखल होऊन दर्शन घेतल्यानंतर संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या १४ दिवसांपासून संजय राठोड अज्ञातवासात गेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यावर बोलताना संजय राठोड यांनी ‘मी १४ दिवस नाही, तर फक्त १० दिवस माध्यमांपासून दूर गेलो होतो, पण मुंबईतल्या माझ्या फ्लॅटमधून माझं प्रशासकीय काम सुरूच होतं’, असं सांगितलं आहे.

काय म्हणाले संजय राठोड?

पूजा चव्हाण प्रकरण उजेडात आल्यानंतर संजय राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली. मात्र, तेव्हापासून संजय राठोड गायब असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी १४ नाही तर फक्त १० दिवस माध्यमांपासून लांब होतो. प्रसारमाध्यमांमध्ये ज्या पद्धतीने या प्रकरणाची चर्चा होऊन माझी बदनामी होत होती. त्या पार्श्वभूमीवर माझ्या कुटुंबासोबत, आई-वडिलांसोबत, पत्नी आणि मुलांसोबत मी थांबलो होतो. त्यांना मी वेळ देत होतो. माझे वयोवृद्ध आई-वडील आहेत. माझ्या पत्नीला देखील ब्लड प्रेशर आहे. या काळात माझं कुटुंब सांभाळण्याचं काम मी करत होतो’, असं ते म्हणाले.

चौकशीतून जे समोर येईल, ते बघा…; संजय राठोडांनी पूजा चव्हाण प्रकरणावर सोडलं मौन

पुन्हा नियमित कामाला सुरुवात

दरम्यान, यावेळी त्यांनी आपण आजपासून पुन्हा नियमित कामाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. ‘माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यातून सत्य काय ते समोर येईलच. त्यामुळे आजपासून मी पुन्हा नियमित कामाला सुरुवात करणार आहे’, असं त्यांनी सांगितलं.