काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ाला काँग्रेसमुक्त करून सातपकी पाच आमदार निवडून आणलेला भाजप महसूल राज्यमंत्री सेनेच्या संजय राठोड यांच्या आक्रमकतेपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. अधिकाराच्या मागणीवरून संजय राठोड यांनी भाजप नेते आणि त्यांच्या त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी ‘पंगा’ घेऊन मुख्यमंत्र्यांना समन्वय समिती गठीत करण्यास भाग पाडले आहे. आपल्या नेत्याशी ‘दोन हात’ करू पाहणाऱ्या संजय राठोड यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी जळगावात केले तेव्हा प्रत्युतरादाखल शिवसनिकांनीही  एकनाथ खडसेंच्या पुतळ्याचे दहन केले.
संजय राठोड यांची आक्रमकता आणि लढाऊ वृत्ती हा स्थायीभाव त्यांच्या मतदारांना इतका भावला आहे की, त्यांच्या विरोधात लढलेल्या कॉंग्रेसच्या माणिकराव ठाकरे आणि संजय देशमुख या माजी मंत्र्यांचा पालापाचोळा करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. संजय राठोड यांना विधिमंडळ कामकाजाचा आणि आंदोलनांचा १० वर्षांंचा अनुभव आहे. आता तर ते राज्यमंत्रीच झाले आहेत. अधिकारहीन मंत्रिपदाची झूल खांद्यावर घेण्यापेक्षा ती फेकून देण्याची तयारी ठेवणाऱ्या संजय राठोड यांनी भाजपच्या नेत्यांशी चांगलाच पंगा घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षपद आणि पालकमंत्रीपदही त्यांच्या पदरात पडले आहे. ही दोन्ही पदे राबवतांना कुणाचाही मुलाहिजा ते ठेवत नाहीत. कायद्याच्या अंमलबजावणीत कुचराई केली तर जिल्हाधिकाऱ्यांनाही धडा शिकविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे भाजप मात्र जिल्ह्य़ाला मंत्रिपद मिळण्याच्या आशेवर दिवस काढत आहे. मदन येरावार यांनी आमदारकीच्या मदानावर दोनदा पराभव आणि दोनदा विजय संपादन करून तिसऱ्यांदा हे मदान सर केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची खात्री असूनही हुलकावणी मिळत असल्याने सत्तेविना सेनानेते संजय राठोड यांच्यावर कुरघोडी करणे अशक्य वाटत आहे. विदर्भात सेनेचे संजय राठोड, शशिकांत खेडकर, संजय रायमुलकर, बाळू धानोरकर असे केवळ चारच उमेदवार निवडून आल्याने सेना मजबूत करण्यासाठी आपल्याला राज्यमंत्र्याऐवजी कॅबिनेट मंत्री करावे, अशी गळ त्यांनी सेना कार्याध्यक्षांकडे घातली होती. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना अनुकूलता दर्शविली असल्याचे समजते. तिचा लाभ घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणतेही निमित्त काढून भाजप नेत्यांना सळो की पळो करून सोडणे, हाच असल्याची पक्की खात्री संजय राठोड यांना झाली असल्याने राज्यमंत्र्यांना अधिकार द्या अन्यथा, महसूल खात्याचे वाभाडे काढण्याचा इशारा देण्यासही राठोड विसरलेले नाहीत.