News Flash

Exclusive : मुख्यमंत्रीपद मागता येऊ नये म्हणून शिवसेनेचे उमेदवार पाडले; राऊत यांचा गौप्यस्फोट

हा धोरणात्मक निर्णय होता

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून शाब्दिक चकमकी झाल्या. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, निवडणुकीच्या काळात झालेल्या घुरघोड्या आता समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. “मुख्यमंत्रीपद मागता येऊ नये म्हणून शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी उमेदवार पाडण्यात आले,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपा आणि शिवसेना महायुतीत होते. मात्र, भाजपानं शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचाच प्रयत्न केला, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्तास्थापनेनंतर संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं मुलाखत दिली. या मुलाखतीत राऊत यांनी अनेक खुलासे केले आहेत. शिवसेनेच्या जागा कमी होण्याची कारण काय? या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या जागा भारतीय जनता पक्षानं पाडल्या. हे जगजाहीर आहे आणि कशाप्रकारे पाडल्या हे रेकॉर्डवर आहे. जेव्हा ठरलं होतं की शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री विभागला जाईल. तेव्हाच हे धोरण ठरलं होतं की, इतकं खच्चीकरण करायचं की शिवसेना मुख्यमंत्रीपद मागायच्या परिस्थितीत राहणार नाही,” असं राऊत म्हणाले.

नेमकं हे कुणी केलं या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी सांगितलं की, “मी व्यक्तिशः कुणाचंही नाव घेणार नाही. हे धोरणात्मक आहे. उद्धव ठाकरे आम्हाला म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात शाह म्हणाले होते की, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. पण, यावर उद्धव ठाकरे यांनी यातून पाडापाडी होण्याची शक्यता असल्याचं सांगत मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा पर्याय सुचवला. त्यावर शाह यांनी संमती दिल्याचं ठाकरे यांनी सांगितलं होतं. मी कोणतीही गोष्ट मान्य करेल पण, उद्धव ठाकरे खोटं बोलतात हे मी कधीही मान्य करणार नाही. बाळासाहेब ठाकरे खोटं बोलणार नाही. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती खोटं बोलणार नाही. एखादी गोष्ट सोडून देऊ, पण खोटं बोलून घेणार नाही. आमच्यावर पक्षाचा संस्कार आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवला. माझ्या नेत्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा आपण संघर्ष केला पाहिजे ही माझी भूमिका आहे,” असं राऊत म्हणाले.

भाजपानं पाठीत खंजीर खुपसला का? असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले,”राजकारणात मी खंजीर शब्द वापरणार नाही. तो वारंवार वापरला जातो. त्याला चाळीस वर्षापूर्वीचे प्रसंग आहेत. पण, तेव्हाही कुणी खंजीर खुपसलेला नव्हता. मात्र, शिवसेनेच्या जागा कमीत कमी याव्या यासाठी षडयंत्र रचले गेले. आमच्यासमोर उमेदवार उभे केले. दुसऱ्या पक्षाचे उमेदवार उभे केले गेले. ४५ मतदारसंघात उमेदवार उभे केले गेले. कशाकरता भाजपानं हे पाप केलं. युतीमध्ये होतो. काही गोष्टी ठरल्या होत्या. ज्या भूमिका ठरल्या होत्या. अशावेळी आपण एकत्र लढलो असतो तर ही वेळ आली नसती,” असा सवालही राऊत यांनी भाजपाला विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:38 pm

Web Title: sanjay raut allegations bjp play game with shivsena in assembly election bmh 90
Next Stories
1 उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावरुन करणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा?
2 पंकजा मुंडे, एकनाथ खडसे पक्ष सोडणार का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर
3 पंकजा मुंडेंच्या पोस्टरवरून कमळ गायब! समर्थकांच्या मनात नेमकं काय?
Just Now!
X