राज्यात भाजपासोबत सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक देण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेला दुय्यम स्थान देत संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं.

“मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच राहणार; यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही”

२०१९ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपाने युती तोडली होती. यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “शिवसेना पाच वर्ष सत्तेत असतानाही प्रत्येक गावातून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेनेला गुलामासारखी वागणूक देण्यात आली”.

शिवसेनेच्या मदतीने मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करत शिवसेनेलाच संपवण्याचा प्रयत्न झाला असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या वैयक्तिक भेटीनंतर संजय राऊत यांचं हे वक्तव्य आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत नसलो तरी नातं तुटलेलं नाही असं सांगत या वैयक्तिक भेटीचं समर्थन केलं होतं. तसंच आपण नवाज शरीफ यांना भेटालया गेलो नव्हतो असं म्हणत काही चुकीचं केलं नसल्याचंही ते म्हणाले होते.

“वाघाच्या मिशीला हात लावायलाही हिंमत लागते, या..मी वाट पाहतोय”

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेच पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याचं सांगत वाटाघाटी झाल्याचे दावे फेटाळून लावले होते. “शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही बांधिलकी आहे. असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.