शिवसेनेचे खासदार संजय राऊ त आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज सातारा शहर आणि जिल्ह्य़ाच्या काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. साताऱ्यात या वक्तव्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो जण सहभागी झाले होते. या वेळी आंदोलकांनी राऊत आणि आव्हाड यांची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढत या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना वापरले जाणारे ‘जाणता राजा’ ही उपाधी गेली काही वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही वापरली जात आहे. यावरून गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोपांच्या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पवारांवर थेट हल्ला चढवत शिवाजी महाराजांसाठी असलेली ‘जाणता राजा’ ही उपाधी गेले अनेक वर्षे वापरल्याबद्दल टीका केली. ही उपाधी स्व:तासाठी वापरणे आणि असा वापर होताना न रोखणे यावरून उदयनराजे यांनी पवारांवर टीकास्र सोडले होते. उदयनराजे यांच्या या हल्ल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे असे नाते असल्याबद्दल पुराव्यांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार यांच्याशी करत ‘जाणता राजा’ ही उपाधी वापरण्याचे समर्थन केले.

या दोन्ही वक्तव्याचे पडसाद सातारा, सांगली, कोल्हापुरात उमटले आहेत. या वक्तव्यांच्या निषेधार्थ आज साताऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहर आणि परिसरातील सर्व व्यवहार, दुकाने, प्रवासी वाहतूक, शाळा-महाविद्यालये आज बंद होती. राऊत आणि आव्हाड यांच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो जण सहभागी झाले होते. या वेळी आंदोलकांनी राऊत आणि आव्हाड यांची गाढवावरून प्रत१कात्मक धिंड काढत या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. राऊत, आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात नगराध्यक्ष माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, अमोल मोहिते, अशोक मोने, अविनाश कदम, संदीप शिंदे, अर्चना देशमुख, सुजीता राजेमहाडिक, सविता फाळके, अनिता घोरपडे, निशांत पाटील, मिलिंद काकडे, राजू भोसले, यशोधन नारकर, रवी साळुंखे, ज्ञानेश्वर फरांदे, गीतांजली कदम, रंजना रावत यांच्यासह सातारा व नगरविकास आघाडीचे नगरसेवक व तसेच उदयनराजे समर्थक मोठय़ा संख्येने सहभागी होते.