पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. तशातच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. या आंदोलनात राजकीय पक्ष सामील झाल्याने हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून राजकीय बंद आहे असा आरोप भाजपाच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे. या आरोपाला संजय राऊत यांनी उत्तर दिलं असून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एक मागणी दिलं आहे.

“आजचा बंद हा राजकीय बंद नाही. या आमच्या भावना आहेत. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना कोणत्याही राजकीय पक्षाचा ध्वज हातात घेऊन निषेध करत नाहीयेत. शेतकऱ्यांच्या एकतेसोबत उभे राहणे आणि त्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. या ठिकाणी कोणतेही राजकरण सुरू नाही आणि भविष्यातही यात राजकीय हस्तक्षेप असता कामा नये. जर सरकारच्या लोकांना शेतकऱ्यांबद्दल खरंच आपुलकी आणि प्रेम असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह हे स्वत: आंदोलनाच्या ठिकाणी जातील, शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

आणखी वाचा- …तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

आणखी वाचा- #BharatBandh: दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“शेतकरी आज रस्त्यावर आहे. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे. आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज शेतकरी रस्त्यावर आहे. तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे? याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.