करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून कटाक्षानं प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पोलीस यंत्रंणा रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहे. असं असताना लॉकडाउनला मुदतवाढ दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकावर हजारो कामगारांनी गर्दी केली होती. या घटनेवरून राजकीय वातावरणही चांगलं तापलं होतं. या घटनेसंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुलाखतीतून संवाद साधला. यावेळी त्यांनी वांद्रेतील घटना राज्य सरकारला अडचणी आणण्यासाठी घडवून आणली गेली, असं म्हटलं. “वांद्रयाची घटना ही ठरवून झालेली होती. सरकारला अडचणी आणण्यासाठी आणि पालघरची घटना ही अफवेतून झालेला अपघात होता. घातपात नाही, अपघात होता. त्याच्या आधी तिथे विशिष्ट विचाराच्या लोकांनी साधूच्या वेशात जिहादी फिरत आहेत सावध रहा, अशा प्रकारचे मेसेज पसरवून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून झालेली हत्या आहे. साधूच्या वेशातून जिहादी फिरताहेत असे मेसेज पसरवणारे कोण होते, ते आज पालघरच्या घटनेविषयी आकांडतांडव करत आहेत. त्यांना या घटनेचं दुःख कमी आहे. त्यांचं दुःख इतकंच आहे की, दुर्दैवानं दोन साधुंची हत्या होऊनही या महाराष्ट्रात दोन धर्मात तेढ निर्माण झाली नाही. दंगल उसळली नाही. त्यांच्या मनासारखं काही झालं नाही, म्हणून ते जोरात बोंबा मारत आहेत,” असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री विरोधकांच्या योग्य सूचना स्वीकारतील

“देवेंद्र फडणवीसांना पाच वर्ष राज्याचा कारभार करण्याचा उत्तम अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला मिळवून दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सहकार्य केलं पाहिजे. प्रशासनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या पाहिजे. मला खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या योग्य सूचना नक्की ऐकतील,” असं राऊत म्हणाले.