News Flash

मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीये, ती…; संजय राऊतांनी भूमिका केली स्पष्ट

"इथे जर भाजपाचं राज्य असतं, तर..."

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संतप्त लाट उसळली होती. कंगनानं केलेल्या विधानानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली होती. हा संपूर्ण वाद राज्याच्या विधिमंडळापर्यंत जाऊन पोहोचला असून, संजय राऊत यांनी त्यावर विस्तृतपणे आपली भूमिका मांडली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षांसह कंगना प्रकरणाचा समाचार घेतला. अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांविषयी आणि मुंबईविषयी वादग्रस्त विधानं केली होती. त्यावरून तिला टीकेचं धनी व्हावं लागलं. सोशल मीडियातून तिच्यावर टीका झाली. त्याचबरोबर संजय राऊत यांनीही या विधानावरून सुनावलं होतं.

या वादासंदर्भात राऊत यांना ‘शिवसेना पुढे काय करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले,”तुम्हाला असं वाटत नाही का, की तुम्ही वारंवार शिवसेनेला प्रश्न विचारताय. मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीय, ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची मुंबई आहे. म्हणून तर विधानसभेतील प्रस्तावावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप असे सगळे एकत्र आहेत. म्हणून तर यासंदर्भात सर्वांत आक्रमक भूमिका कुणी घेतली? अनिल देशमुखांनी काही गोष्टी ठामपणे सांगितल्या. मुंबईचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं राज्याचे गृहमंत्री म्हणाले. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत या तिघांनीही ठामपणे सांगितलं, मुंबईविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा. कारण हा विषय राज्याचा आहे, एखाद्या पक्षाचा आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बोलवता धनी कोण आहे?

संजय राऊत यांना ‘बोलवता धनी कोण आहे?’ असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “या सगळ्या प्रकरणात कंगना रणौत वगैरे लोकांचं समर्थन कोण करतंय? आम्ही नाही करत. भारतीय जनता पक्ष समर्थन करतोय. का करतोय? खरंतर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मागे कुठल्याच राजकीय नेत्यांने राहू नये. भाजपानं समजून घेतलं पाहिजे. तेही कालचे राज्यकर्ते होते. इथे जर भाजपाचं राज्य असतं, तर चित्र वेगळं दिसलं असतं. एखाद्या चॅनेलवर नरेंद्र मोदी साहेबांवर, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी उल्लेखात कुणी काही बोलले असते, तर तुरुंगात गेले असते. इतर राज्यात तसं झालंय. उत्तर प्रदेशात बघा. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कुणी कार्टून काढलं, कुणी लिहिलं, तर तुरुंगात गेलेत. महाराष्ट्रात तशी परंपरा नाही. आम्ही संयमाने वागतो, काटेकोरपणे वागतो, कायद्याचं पालन करतो, त्याचा गैरफायदा हे लोक घेत आहेत,” अशी टीका राऊत यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 11:18 am

Web Title: sanjay raut clarifies his stand in kangana ranaut dispute bmh 90
Next Stories
1 “… ते स्वतःचं कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत”; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
2 ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’; चंद्रपूर जिल्ह्याचा ‘मिशन मॅथमॅटिक्स’ सर्जनशील उपक्रम
3 हिंगोलीतील बनावट नोटा प्रकरणाचे पांढरकवडा कनेक्शन उघड
Just Now!
X