राज्यात करोनाच्या संकटातच अभिनेत्री कंगना रणौतच्या विधानांमुळे नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. हा वाद शांत होण्याआधीच नेव्हीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच शिवसेनेला अनेक प्रश्न विचारले जात आहे. या मुद्यांवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका मांडली असून, राज्यातील विरोधीपक्ष असलेल्या भाजपालाही त्यांनी सल्ला दिला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एएनआय वृत्तसंस्थेला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुलाखत दिली. या मुलाखतीत राऊत यांना कंगना रणौत वादासह इतर मुद्यांवर प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले,”कंगना रणौतचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. पण, या वादात सहभागी झालेल्या प्रत्येक गोष्टीची आणि कृतीची आम्ही नोंद घेत आहोत. महान राज्याविषयी कोणता राजकीय पक्ष आणि वैयक्तिकरित्या कोण काय विचार करतोय, हे आम्हाला समजेल,” असं राऊत म्हणाले.

नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीविषयी बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात कायद्याचा नेहमीच सन्मान केला जातो. तुम्हाला माहितीये का उत्तर प्रदेशात किती माजी सैनिकांवर हल्ले झाले आहेत? पण, तरीही संरक्षण मंत्री त्याविषयी बोलत नाहीत. सरकारमधील मंत्री चीनच्या मुद्यावर बोलत नाहीत. ते मुंबईतील एका गल्लीत झालेल्या घटनेवर बोलत आहेत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

भाजपावरही राऊत यांनी निशाणा साधला. “राज्यातील सत्ता हातातून गेली म्हणून तुम्ही इतका तमाशा करत आहात. तुम्ही एका राज्याला, त्या राज्याच्या संस्कृतीला बदनाम करत आहात. विरोधी पक्षानं संयम ठेवला पाहिजे. राजकारणात असे चढउतार येतातच. सत्ता येते, सत्ता जाते. लोकशाहीमध्ये बहुमत चंचल गोष्ट असते. जर तुम्हाला ते समजत नसेल, तर तुम्हाला राजकारण करण्याचा अधिकार नाही,” असा सल्ला राऊत यांनी भाजपाला दिला.