परीक्षा घ्या हा आग्रह चुकीचा असल्याचं नियतीनं दाखवून दिलंय. त्यामुळे आता परीक्षांसंदर्भात राज्यपालांनी आतातरी पुनर्विचार करावा, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राजभवनातील करोनाची लागण गांभीर्यानं घेतली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

“परीक्षा घ्या, परीक्षा घ्या… हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आग्रह किती चुकीचा आहे, हे त्यांना नियतीनंच दाखवून दिलंय. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचं का?” असा सवाल करत संजय राऊत म्हणाले की, “हे इश्वरानं दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, इश्वर यांना मानणारे आहेत.” एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असंही राऊत म्हणाले.

आता तरी यूजीसीला पटेल का?
राजभवनामधील १८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुनच परीक्षा घेणं किती धोकादायक आहे हे दिसून येत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असताना राजभवनातील जवळपास १८ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी ट्विटवरुन मत व्यक्त करताना परीक्षा घेण्यासाठी वातावरण सुरक्षित नसल्याचं ट्विटवरुन म्हटलं आहे.

सामंत यांनी, “राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला. आता तरी एचआरडी आणि युजीसीला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?,” असे प्रश्न उपस्थित केले आहेत.