विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, विरोधकांनी कितीही आपटा, आमचाच उमेदवार निवडून येणार असा दावा करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोणीही कितीही ताणाताणी करा, आरडाओरडा करा पण आम्हीच जिंकणार यात काही शंका, संदेह नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकांसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आपणच जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच सामंजस्याने, मोठ्या मनाने निवडणुका बिनविरोध कराव्यात असं प्रतिपादनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला, ताणाताणी केली तरीही शेवटी आम्हीच जिंकणार आहे. शंकेचं वातावरण जरी निर्माण केलं तरी विरोधी पक्षाला यश मिळणार नाही. त्यामुळे सामंजस्याने, मोठ्या मनाने निवडणुका टाळता आल्या तर महाराष्ट्रावर फार उपकार होतील.

ईडीची कारवाई म्हणजे पाठीवर वार करणे

अजित पवारांच्या आप्तांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईबद्दल संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ईडीचा वापर करणं म्हणजे पाठीवर वार करण्यासारखं आहे. जे सत्तास्थापनेत आहेत त्यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. कारवाया सुरु आहेत, कारवाईला गती देण्याच्या धमक्या देणं, कारवाया घडवून आणू असे संदेश देणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ते पुढे म्हणाले, सरकार आणणं, सरकार पाडणं हे काम केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही.