राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेनेच त्यांचा घात केला आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेता झाले, हा काळानं त्यांच्यावर उगवलेला सूड आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत आणि शिवसेनेची भूमिका मांडण्यात खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निकाल आणि सत्तास्थापनेच्या काळात झालेल्या घटना घडामोडींसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्याशी ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं संवाद साधला. हे सरकार फार काळ टिकणार नाही. आम्ही सरकारला टिकू देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या विधानाच्या संदर्भानं राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “आम्हाला आनंद आहे. विधानसभेत एक मजबूत विरोधीपक्ष आहे. त्या विरोधी पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. हा त्यांच्यावर काळानं घेतलेला सूड आहे. या निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाही विधानसभेत पाहा, अशाप्रकारची भाषा या लोकांनी केली. विरोधी पक्ष आलाच तर वंचित बहुजन आघाडी. अशाप्रकारे हास्यास्पद राजकीय विधान करून किंवा शरद पवारांचं पर्व संपलं. शरद पवार दिसणार नाही. कोणताही प्रगल्भ राजकीय नेता अशाप्रकारची विधानं या महाराष्ट्रात तरी करणार नाही. आज काळानं विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनाच केलं. हा सूड आहे काळानं घेतलेला. जनतेनं घेतलेला. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) आता विरोधी पक्षनेता म्हणून विधायक भूमिका घेतल्या पाहिजे. विरोधासाठी विरोध कशासाठी करता. तीन पक्ष एकत्र आले. पण, ते लोकशाही मार्गानं आलेले आहेत. हे लक्षात घेतल्यावर सर्वात मोठा विरोधी पक्षानं सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रात टिकू देणार नाही. अशी भाषा करता, या भाषेनेच तुमचा घात केला आहे,” असा असा चिमटा राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला.