राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी लेख लिहिला. त्यात काँग्रेसनं अन्याय केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पटेल यांच्या काँग्रेसनं पवारांवर अन्याय केल्याच्या मुद्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला राऊत यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पवारांवर काँग्रेसनं अन्याय केलाय, हे मी वारंवार म्हणत आलोय. शरद पवार हे देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. आज त्यांचं वय ८० झालंय. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर फक्त शरद पवार आहेत. पण, शरद पवारांचं कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरलं. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तरेकडील नेत्यांनी शरद पवारांना कायम अडथळ्यात टाकण्याचं काम केलं. शरद पवार केव्हाच पंतप्रधान व्हायला हवेत होते. पण होऊ द्यायचं नाही, या एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आलं,” असं राऊत म्हणाले.

“काँग्रेसनंही कधीकाळी भाजपा-जनसंघाला संपवलं होतं”

“काँग्रेस दीडशे वर्षांपासून देशात काम करतोय. कुणी कुणालाही संपवत नाही. दोन खासदार असलेला भाजपा सत्तेमध्ये आहे आणि सर्वशक्तिमान आहे, हे मान्य केलं पाहिजे. तेव्हा कुणी कुणाला संपवत नाही. काँग्रेसनं कधीकाळी भाजपाला संपवलं होतं. जनसंघाला संपवलं होतं. पक्षाचा नेता पक्षाला कशी दिशा दाखवतो. कसं नेतृत्व करतो, त्यावर त्या पक्षाचं अस्तित्व आणि भवितव्य ठरतं असतं,” असं म्हणत राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सल्ला दिला.