राज्यात मधल्या काळात सरकार पडणार असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं होतं. त्यावरून बरंच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. विरोधी बाकांवरील भाजपाकडूनही सरकार पडणार असल्याचं म्हटलं जात होतं. या सगळ्यांचा समाचार घेत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. दिल्लीतील चर्चेचा हवाला देत ठाकरे सरकार पाडण्यासाठी मुंबईतील भाजपा नेत्याकडे दोनशे कोटी रुपये पाठवण्यात आले होते,” असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर केला.

शिवसेना दसरा मेळाव्याचं प्रास्ताविक करताना संजय राऊत म्हणाले,”करोना संकट नसतं, तर हा मेळावा अभूतपूर्व असता. आजचा हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय आहे. गेल्यावर्षी युद्धाला प्रारंभ झाला आणि आपण महाराष्ट्र राज्यात असत्यावर विजय मिळवला. गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात मी सांगितलं होतं की पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आज व्यासपीठावर शिवसेनाचा मुख्यमंत्री आहे. सेना प्रमुखांनी आम्हाला रस्ता दाखवला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालात म्हणजे महाराष्ट्रातील ११ कोटी जनता मुख्यमंत्री झाल्यासारखं मला वाटतंय,” असं राऊत म्हणाले.

“११ कोटी जनतेचे आशीर्वाद या सरकारच्या मागे आहेत. ठाकरे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. कुणी कितीही चिखलफेक केली, तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार आहे. जनतेच्या मनात आम्ही आत्मविश्वास निर्माण केला. महाराष्ट्राचे आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रावर आलेल्या करोना, वादळ आणि इतर संकटाला तोंड देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डगमगले नाहीत. चिखलफेक झाली तरी ते राज्याचा कारभार करत आहेत. मराठी माणसाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला,” असंही संजय राऊत म्हणाले.

“नवीन नवीन तारखा देत असतात. मी दिल्लीला गेलो की, तिथे लोकं सांगत असतात की, भाजपाच्या अमुकतमुक नेत्याकडे दोनशे कोटी रुपये मुंबईत पोहोचले आहेत. सरकार पाडण्यासाठी. मी म्हणालो, दोनशे कोटी फारच कमी आकडा आहे मुंबईत. हे सरकार पाडण्यासाठी. तुम्ही आमची इज्जत कशा करीता काढता. तुम्ही असे दोन हजार कोटी, पाच हजार कोटी, जे तुम्हाला शोभतील ते आकडे तुम्ही सांगा. दोनशे कोटी वगैरे काय? हे तुमच्यासाठी नगरपालिकेचे आकडे आहेत. तारखा तुम्ही कितीही द्या. पैशाचा खेळ कितीही करा, पण या सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण ११ कोटी जनतेचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद या सरकारच्या पाठिशी आहेत,” अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकार पाडापाडीच्या चर्चांचा समाचार घेतला.