महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगलीमधील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दात टिका केली आहे. कोश्यारी तसे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी ते राज्य सरकारसोबत होत असलेल्या वादांमुळे चर्चेत आले, तर कधी त्यांनी स्वत: वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या विधानांमुळे ते चर्चेत राहिले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगलीत झालेल्या एका जाहीर सभेत मिश्किलपणे बोलताना केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये राज्यपालांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, व्यासपीठावरून बोलताना ते जयंत पाटील यांना देखील उल्लेखून बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातून निघून जाण्यासंदर्भात वक्तव्य केलं असून यावर राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवताना पुन्हा १२ आमदारांचा मुद्दा उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> “उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा”

भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना उत्तराखंडमधील पावसाची महाराष्ट्रात गेल्या वर्षी आणि या वर्षी देखील झालेल्या अतिवृष्टीशी तुलना केली आहे. “इथे सगळ्यांनी पुराची चर्चा केली. इतका पूर आला, एवढं पाणी भरलं वगैरे. तुम्ही केदारनाथच्या त्या घटनेविषयी ऐकलंच असेल, जेव्हा एकाच वेळी ५ हजाराहून जास्त लोक मृत्यूमुखी पडले (केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये मोठा हाहाकार उडाला होता). तुम्ही कल्पना करू शकता, की मी कोणत्या भागातून येतो”, असं राज्यपाल यावेळी मिश्किलपणे म्हणाले. यावेळी राज्यपालांनी स्वत:लाच उद्देशून एक विधान केलं. “”कधीकधी मला वाटतं, की भगतसिंह, तू जेव्हापासून आलाय, तेव्हापासून इथे दुष्काळ तर पडला नाही, पण तिथे डोंगराळ भागातही (उत्तराखंड) पाऊसच होता आणि आता इथेही पाऊसच पडतोय, अतिवृष्टी होतेय. आता यासाठी काय करावं?”, अशी कोटी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक : शिवसेनेची मोठी घोषणा; म्हणाले, “भाजापाला धडा शिकवण्यासाठी…”

इतक्यावरच न थांबता मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांच्याकडे बघून बोलताना राज्यपालांनी महाराष्ट्रातून निघून जाण्यासंदर्भात एक विधान केलं आणि त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं. “मी इथे आल्यापासून पाऊस, अतिवृष्टी व्हायला लागली. जर हे जयंतजींना वाटतंय, तर मी लवकरात लवकर इथून सोडून निघून जाईन. कारण त्यांना नुकसान झाल्याचं ते सांगतायत. असंच तर नुकसान नसेल झालं ना पाटील साहेब?” असा खोचक सवाल देखील त्यांनी केला. पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने सक्रीय राजकारणात परतण्याचा राज्यपालांचा प्रयत्न असून त्याअनुषंगानेच उत्तराखंडचा संदर्भ आणि इथून निघून जाण्याचा उल्लेख राज्यपालांनी केला असावा, असा तर्क आता राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

जयंत पाटील नक्की काय म्हणाले होते?

अभिनेत्री दिपाली सय्यद हिने सुरु केलेल्या एका ट्रस्टच्या उद्घाटनाच्या प्रसंगी राज्यपाल आणि जयंत पाटील उपस्थित होते. मंचावर भाषण देताना पाटील यांनी,  “तुमच्या इतकी चांगली हिंदी नाहीय माझी असं म्हणत जयंत पाटलांनी भाषणाला सुरुवात केली. पुढे त्यांनी सांगताना पुराचं वर्णन केलं. आपण जिथे हा कार्यक्रम घेतोय तिथून थोडं पुढे गेल्यानंतर जी गावं लागतात ती सर्व पाण्यात बुडाली होती. आपण बसलोय ते गावही पाण्याखाली होतं,” असं राज्यपालांना उद्देशून म्हटलं. यावरुनच राज्यपालांनी त्यांच्यावर टीका केली.

नक्की वाचा >> गांधी जयंतीपासून अनिल परबांचं बेकायदेशीर कार्यालय पाडण्यास सुरुवात होणार; किरीट सोमय्यांचा दावा

राऊतांचा टोला

राज्यपालांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच संजय राऊत यांना यांसदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “ते काही बोलले असतील तर मला तुमच्याकडूनच कळतंय. पण ते राज्यात चांगले रमले होते. राजभवनात रमले होते. अनेक काम करताना ते पक्ष कार्यही चांगलं करत होते. त्यांचं आणि इथल्या भाजपाचं चांगलं जुळलं होतं. जायचं असेल तर जाता जाता १२ आमदारांच्या फाइलवर सही करुन जा. थोडं पुण्य आपल्या पदरी (पडेल),” असा टोला राऊत यांनी लगावला.