काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. सोनियांच्या या पत्रावरून राज्यात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. दबाबाचं राजकारण सुरू असल्याचंही बोललं जात असून, या चर्चेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पूर्ण विराम दिला आहे.

“राज्यातील महाविकास आघाडीचा सहकारी म्हणून, काँग्रेस पक्ष समाजातील दुर्बल घटक, विशेषत: दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतर उपेक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारने वंचित-उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी उपक्रम राबवावे, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली होती.

या पत्रासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले,”महाराष्ट्र आणि राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी एखादा कार्यक्रम काँग्रेस पुढे आणत असेल, तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. यात कोणतंही दबावाचं राजकारण नाही,” असं म्हणत राऊत यांनी सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

सोनिया गांधींनी काय केल्या सूचना?

राज्यातील शासकीय नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती व जमातीचा अनुशेष विशेष भरती मोहीम राबवून भरून काढावा. सरकारी कंत्राटांमध्ये आरक्षण असावे, या समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास महत्त्वपूर्ण आहे, त्यास सर्वोच्च प्राधान्य मिळावे. शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहाच्या सुविधा, विशेषत: निवासी शाळांचा विस्तार करणे आवश्यक आहे, अशा सूचना सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.