कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात यंदाच्या आठवड्यामध्ये ‘ठाकरे’ सिनेमाची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी आणि संजय राऊत हे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असणाऱ्या मकरंद अनासपुरेबरोबर मनमोकळ्या गप्पा मारताना अनेक किस्से शेअर करताना दिसणार आहेत. नवाजुद्दीन करिअरबद्दलच्या आठवणी तर संजय राऊत या राजकारणामधील काही आठवणी सांगताना या कार्यक्रमात दिसतील.

कार्यक्रमाचा एक टीझर कलर्स मराठीने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊत हे कार्यक्रमातील एका खेळादरम्यान नरायण राणे यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो असलेले चक्र फिरवून त्या नेत्यांबद्दल राऊत यांनी एक आवडणारी आणि एक न आवडणारी अशा दोन गोष्टी सांगायच्या असा खेळ या शोमध्ये रंगला. त्यामध्ये पहिलेच नाव नारायण राणे यांचे आले. बाणासमोर राणेंचा फोटो थांबताच राऊत यांनी ‘तुम्ही ठरवून बाण लावताय की काय?’ असा मजेशीर प्रश्न विचारला. राऊत यांच्या या प्रश्नानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर संयम बाळगायला हवा होता असं मत राऊत यांनी व्यक्त केले.

‘नारायण राणे जेव्हा शिवसेनेमध्ये होते, आमचे सहकारी होते तेव्हा ते खरोखरचे कडवट शिवसैनिक होते. बाळासाहेबांवर त्यांचे प्रेम होतं ही त्यांची चांगली गोष्ट आहे’, असं राऊत यांनी सांगितलं. पण राणे यांच्याबद्दलची वाईट गोष्टी सांगताना राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर संयम बाळगायला हवा होता जो त्यांनी बाळगला नाही असं मत राऊत यांनी व्यक्त केले. ‘जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा संयम बाळगायला हवा होता. कारण आज नारायण राणे जे काही आहेत त्याचा पाय शिवसेनेमध्ये आहे.’ असं स्पष्ट मत राऊत यांनी माडलं. त्यावेळी मकरंद अनासपुरेंनी ‘नक्की कशाबद्दलचा संयम बाळगायला हवा होता?’ असा प्रतिप्रश्न राऊत यांना केला. ‘सगळ्याच बाबतीत त्यांनी संयम बाळगायला हवा होता’ असं राऊत यांनी उत्तर दिले. पुढे बोलताना, ‘राजकारणामध्ये संयमालाही खूप महत्व आहे. पक्ष सोडल्यानंतरही संयम बाळगता येतो. अशी अनेक उदाहरणे या देशामध्ये आहेत. त्यांनी तो संयम शिवसेनेच्या बाबतीत आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत त्यांनी तो पाळायला हवा होता.’ असं राऊत म्हणाले.

२५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वा. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.