उगवत्या सूर्याला नमस्कार करणं ही जगाची रीत आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. कर्नाटकमध्ये जे राजकीय नाट्य घडलं त्यावर संजय राऊत यांनी भाजपाला हा टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे भाजपातील इनकमिंगवरही त्यांनी भाष्य केलं आहे. एकेकाळी संघाला आणि भाजपाला शिव्या देणाऱ्या लोकांचा सध्या पक्षप्रवेश होतो आहे. इतरांकडे निष्ठा राहिलेली नाही मात्र शिवसेनेकडे निष्ठा कायम आहे. आमच्या पक्षात सचिन अहिर आले मात्र ते कोणत्याही कमिटमेंटशिवाय आले आहेत असंही राऊत यांनी सांगितलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. भाजपामध्ये होणारे पक्षप्रवेश हे स्वार्थापोटी होत आहेत असे चंद्रकांत पाटील म्हटले होते. कोण माणूस कुठे गेल्यावर शुद्ध होतो यावर माझा विश्वास नाही. विचारधारा मान्य असते म्हणून कोणी इतर पक्षांमध्ये जात नाही ती फक्त वेळेची तडजोड असते असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विचारधारा वगैरे शब्द कोणीही वापरू नये आता विचारधारा वगैरे काही राहिलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पक्षांतरासाठी दबाव टाकला जातो आहे हा आरोप शरद पवार यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केला होता. याबाबत विचारले असता जे आत्ता इतरांना नावं ठेवतात त्यांनी आधी काय केलं हे त्यांना माहित नाही का? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी तयार झालेली माणसं राष्ट्रवादी काँग्रेसने फोडली, त्यावेळी शिवसेनेला काय वाटलं असेल असा विचार फोडणाऱ्यांनी केला होता का? असंही संजय राऊत यांनी विचारलं आहे. विरोधी पक्ष टिकला पाहिजे, कारण विरोधकच उरले नाहीतर सत्ताधारी माजतील आणि लोकशाहीचं डबकं होईल असं होता कामा नये असंही राऊत म्हटले आहेत.

कर्नाटकमध्ये आमदारांची फोडाफोडी झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.