बंद पुकारुन राज्य अशांत करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. उदयनराजे भोसले यांच्याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज सांगली बंदची हाक दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विटवरुन पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसेल तरी बंद पुकारुन राज्य अशांत करणाऱ्यांना या शब्दांवरुन त्यांचा रोख शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या दिशेने असल्याचे स्पष्ट होतं आहे.

काय म्हणाले राऊत?

संजय राऊत यांनी ट्विटवरुन सांगली बंदच्या पार्श्वभूमीवर ट्विटवरुन दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी ‘सत्यमेव जयते’ इतकचं लिहिलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी बंदमुळे राजकीय बेरोजगारांना कंत्राटी कामगार म्हणून काम मिळाल्याचा टोला लगावला आहे. “काही राजकीय बेरोजगारांना कंत्राटी कामगार म्हणून राज्यात काम मिळाले आहे. त्याचा लाभ त्या मंडळींनी जरूर घ्यावा. पण राज्य अशांत कराल तर जनता माफ करणार नाही,” असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे वाद?

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे, अशी मागणी केली होती. त्यावर साताऱ्याचे माजी खासदार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर टीका केली. “शिवसेनेने पक्षाचे नाव ठेवताना आमची परवानगी घेतली होती का?,” असा सवाल उदयनाराजेंनी उपस्थित केला. बुधवारी पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी, “उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही,” असं मत व्यक्त केलं होतं. “आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेलं,” असंही यावेळी ते म्हणाले होते.

आणखी वाचा – उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नाही – संभाजी भिडे

काय आहे संभाजी भिडेंचे म्हणणे?

“सांगली बंद शिवसेनेविरोधात नसून छत्रपती परंपरेचा अवमान करणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे. देशाला शिवसेनेच्या विचारांची नितांत गरज आहे,” असं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. छत्रपतींच्या परंपरेचा अपमान करणं तसंच उदयनराजेंविरोधातील वक्तव्याचा संताप व्यक्त करण्यासाठी हा बंद पुकारला असल्याचं संभाजी भिडे यांनी सांगितलं. “हा बंद कोणत्याही पक्षाविरोधात नाही. पूर्ण देशावर शिवसेनेचं राज्य असावं इतका त्यांच्याबद्दल आदर आहे. पण जर शिवसेनेतील कोणी इतकं बेताल वक्तव्य करत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावं. समाजाचं स्वास्थ बिघडवू नये,” अशी मागणी संभाजी भिडे यांनी यावेळी केली. “संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असं वागलेलं चालणार नाही. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.