राजकारणात कोण कधी कोणत्या मुद्द्यावरून खिंडीत गाठेल सांगता येत नाही. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांकडे लक्ष ठेवूनच असतात. एखादा मुद्दा हाताला लागला की, पकडलंच कैचीत. महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काहीसं झालं आहे. निमित्त ठरले एक ट्वीट… जे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी रिट्विट केलं. मराठी भाषेच्या मुद्द्यावर असलेल्या याच ट्विटवर बोट ठेवत भाजपाने राऊतांना कैचीत पकडलं. “राऊतसाहेब, तुमच्या भावना मांडल्या म्हणून रिट्विट केलं ना?,” असा चिमटाही भाजपाने काढला.

प्रचंड गोंधळानंतर राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकची अधिसूचना काढली. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जात असा मुद्दा उपस्थित करत पत्रकार प्रशांत कदम यांनी राज्य सरकारच्या इंग्रजीतील अधिसूचनेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं होतं. हेच ट्वीट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रिट्विट केलं. राऊतांनी ट्वीट रिट्विट केल्यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यावरून राऊतांवर निशाणा साधला.

संबंधित बातमी : राज्य सरकारचा शासन आदेश मराठीत का नाही?; संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet मुळे चर्चा

“संजय राऊतजी, असत्याचे ओझे तुम्हालाही डोईजड झाले आहे ना? आधी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याच्या तुमच्या मतास ठाकरे सरकारने पाने पुसली. आता शिवसेनेचा मराठी बाणा खुंटीवर टांगला. राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा. तसेही, पत्रकार की खासदार या संभ्रमातच तुम्ही अडकलेले आहात. त्यात आता नवी भर. मराठीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ठाकरे सरकारला रोखठोक सवाल करायला पत्रकाराचा बाणा लागतो. तुमच्या भावना प्रशांत कदम यांनी मांडल्या म्हणून रिट्विट केलं ना?,” असं म्हणत उपाध्ये यांनी राऊतांना लक्ष्य केलं.

संजय राऊतांनी रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत, तर त्यांना बडवणार. मराठी मराठी करत मतंही मागणार. पण महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच. संपूर्ण करोना काळात हे कायम घडत आलंय. सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही?,” असा मुद्दा पत्रकार प्रशांत कदम यांनी ट्विट करून उपस्थित केला. हेच ट्विट संजय राऊत यांनी ट्विट केलं.